काही लोकांच्या बुद्धीवर बुरशी चढली; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

19 Jul 2024 19:23:58

DCM Devendra Fadnavis attack on opponents
 
 
सातारा :
छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमधून आणलेली वाघनखं सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहेत. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये ही वाघनखं सध्या ठेवण्यात आली आहेत. या कार्यक्रमाचे उद्धघाटन शुक्रवारी (19 जुलै) झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी भाषणादरम्यान फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
 
वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यावर फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला, तो प्रसंग आपण अनेक पिढ्यांपासून ऐकत आलो आहे. यासाठी शिवरायांनी ज्या शस्त्राचा वापर केला, ती वाघनखं आपल्या महाराष्ट्रात आली असून साताऱ्यात दर्शनासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
 
सुधीर मुनगंटीवार यांनी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाखनखं भेट दिली आहे. खरं तर आता या वाघनखांनी कुणाचा कोथळा काढायचा नाही. मात्र, काही लोकांच्या बुद्धीवर बुरशी आणि गंज चढला आहे. त्या वाघनखांनी त्यांच्या बुद्धीवरची बुरशी आणि गंज काढण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करायचे आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
Powered By Sangraha 9.0