शेअर मार्केट गुतवंणुकीची लिंक पाठवून पुन्हा एकाला गंडविले

18 Jul 2024 19:30:45
- सायबर ठाण्यात व्हाटसॲप समुहधारकासह सात बॅक खातेधारकांवर गुन्हा
- 6 लाख 47 हजार रुपयांनी फसवणूक

fraud share market 
अमरावती :
शेअर मार्केटमध्ये गुतवंणुक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एकाला लिंक पाठविण्यात आली आणि त्यानंतर त्याला पैसे गुतवंणुक करण्यास भाग पाडून, त्यांची 6 लाख 47 हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ही धक्कादायक घटना 16 जुलै रोजी उघडकीस आली. या घटनेची तक्रार सायबर पोलिस ठाण्यात फिर्यादी रवी दुल्हानी (40, रा. नवीवस्ती, बडनेरा) यांनी नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी व्हॉट्सॲप ग्रुपधारक आणि सहा बँक खातेधारकांविरुध्द फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
 
रवी दुल्हानी यांना 26 मार्च रोजी एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून एक लिंक मिळाली होती. त्यांना त्यावर क्लिक करण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर संबंधित आरोपींनी रवि यांना शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन गुंतवणूकीचे आमिष दाखवून त्यांची नोंदणी केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना शेअर ऑनलाइन ट्रेडिंग करण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या बँकेच्या खात्यांमध्ये ऑनलाइन रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यानुसार, दुल्हानी यांनी एक्युआर वेल्थ ट्रेनिंग कॅम्प या ॲपमध्ये पैसे पाठवून गुंतवणूक केली. त्यावेळी त्यांनी भरलेल्या रक्कमवर नफा मिळाल्याचे दाखविण्यात आले. परंतू त्यांनी ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता, ती काढता आली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे रवि यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी 16 जुलै रोजी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
Powered By Sangraha 9.0