शरद पवार दंत महाविद्यालयात लेमन स्टार्टअप उपक्रम

    18-Jul-2024
Total Views |
- पर्यावरणपूरक उद्योजकतेसाठी नव्या जगाची ओळख - डॉ. बोरले

Sharad Pawar Dental College 
वर्धा :
विद्यार्थ्यांना उद्याचे पर्यावरणपूरक उद्योजक बनविण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्याने परिपूर्ण अशा नव्या जगाची ओळख करून देत त्यांना प्रेरणा, मार्गदर्शन व प्रशिक्षण देणारा हा उपक्रम आहे, असे प्रतिपादन दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे महासंचालक डॉ. राजीव बोरले यांनी केले. मेघे अभिमत विद्यापीठ आणि लेमन आयडियाज यांच्या संयुक्त विद्यमाने सावंगी (मेघे) येथील शरद पवार दंत महाविद्यालयात स्टार्टअप यात्रा उपक्रम कार्यान्वित करण्यात आला.
 
या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे प्रारंभी दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनोज चांडक व संचालक मनीषा मेघे यांनी अभिनंदन केले. लेमन आयडियाजचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मेनारिया, लेमन स्कूल ऑफ एंटरप्रेन्योरशिपचे संचालक मुकेश अशार यांनी या उपक्रमाची सुरुवात करीत अत्याधुनिक उद्योजकतेबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे विशेष अतिथी डेंटिस्ट ऑन व्हील्सचे संस्थापक डॉ. इशित करोली, लेमन आयडियाजचे उपाध्यक्ष सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल सौरभ शाह, प्रमुख समन्वयक अश्विन कोरडे यांनी या उपक्रमाची सूत्रे सांभाळली. या उपक्रमात दंत महाविद्यालयाचे सुमारे दोनशे विद्यार्थी सहभागी झाले तर १८० विद्यार्थ्यांनी उद्योजकतेसाठी लेमन आयडियाजच्या ई अड्डा क्लबचे सदस्यत्व स्वीकारले.
 
लेमन आयडियाजच्या कौशल्य प्रशिक्षणामुळे आमचे विद्यार्थी प्रेरित होऊन उद्योजकीय प्रवासासाठी सज्ज होतील, असा विश्वास डॉ. मनोज चांडक यांनी यावेळी व्यक्त केला. तर, विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम नाविन्यपूर्ण, आत्मनिर्भरता वाढविणारा आणि भविष्यातील यशाचा मार्ग मोकळा करणारा आहे, असे मत शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. विद्या लोहे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. पवन बजाज, डॉ. पुनित फुलझेले, डॉ. अलका हांडे, डॉ. विक्रांत जाधव यांच्यासह अभिमत विद्यापीठातील संशोधन व विकास विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले.