पार्किंग समस्या समन्वयाने सोडविणे शक्य - डॉ. अशोक करंदीकर जनआक्रोशचा उपक्रम

18 Jul 2024 11:35:12

Ashok Karandikar
 
 
नागपूर :
सद्यस्थितीत नागपुरात पार्किंगची भीषण समस्या आहे. ही समस्या एनएमसी, पोलीस विभाग आणि नागरिकांच्या समन्वयाने सोडविता येणे शक्य असल्याचे मत जनआक्रोशचे वरिष्ठ सदस्य आणि रस्ते सुरक्षा विषयाचे तज्ञ डॉ. अशोक करंदीकर यांनी व्यक्त केले.
 
चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क येथे जनआक्रोशतर्फे बुधवारी ‘वाहनांची पार्किंग समस्या’ या विषयावर संवाद सत्र आयोजित करण्यात आले होते.
 
ते म्हणाले, शहरात मोठमोठ्या बिल्डिंग होतात, परंतु पार्किंगसाठी योग्य व्यवस्था नसते. त्यामुळे अर्धा रस्ता गाड्यांच्या पार्किंगमध्ये जातो आणि रहदारीला अडचण होते. घर बांधताना देखील पार्किंगचे नियम आहेत. परंतु त्याची कोणी दखल घेत नाही. त्यामुळे गाड्या रस्त्यावरच उभ्या केल्या जातात. शहरात काही ठिकाणी पे अँड पार्कची व्यवस्था आहे परंतु नागरिक त्याचा उपयोग करीत नाहीत. आजकाल मोठमोठ्या शहरांमध्ये मल्टीलेव्हल पार्किंगची व्यवस्था असते. परंतु आपल्या देशाची लोकसंख्या बघता तशा प्रकारची पार्किंग सुविधा वाढविण्याची गरज आहे. शहरातील फुटपाथ तर फक्त हॉकर्सकरिताच आहेत की काय? अशी स्थिती आहे. सद्यस्थितीत पार्किंग समस्या थोडी कमी करण्याकरिता त्यांनी काही उपायही सूचविले. ते म्हणाले, नागरिकांनी मेट्रो, बसने प्रवास केल्यास किंवा वाहन शेअर केल्यास पार्किंगची समस्या कमी होऊ शकेल. तसेच पोलूशन कमी होण्याला देखील मदत होईल. शहरात अनेक ठिकाणी मोठमोठे कॉम्प्लेक्स तयार होतात. अशा ठिकाणी बिल्डर्सना जास्तीची पार्किंग व्यवस्था करण्याची परवानगी मिळाल्यास ही समस्या कमी होऊ शकते, असे ते म्हणाले. यावेळी जनआक्रोशद्वारे तयार केलेले वाहतुकीच्या नियमांचे व्हिडिओ दाखविण्यात आले.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनआक्रोशचे सचिव रवींद्र कासखेडीकर यांनी, तर आभारप्रदर्शन अजित परूळकर यांनी केले. यावेळी अनिल जोशी, विश्वनाथ पांडे, दत्तात्रेय कुळकर्णी, किशोर भैसारे, मिलिंद रहाटगावकर, विवेक अमीन, रमेश शाहारे, रमेश लोखंडे, व्यंजन सातपुते, अरुण बक्षी आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0