वाडीतील पाणी, रस्ते अशा महत्वाच्या समस्या मार्गी लावा

18 Jul 2024 19:26:22
- महाविकास आघाडीचे मुख्याधिकारी सोबत चर्चा

mva 
वाडी :
राज्याची उपराजधानी नागपूर शहराच्या हाकेच्या अंतरावर वसलेल्या गोदामनगरी वाडी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्याचप्रमाणे शहरांतर्गत विविध समस्यांचा भर पडत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे यापेक्षा ग्रामपंचायत प्रशासन बरे होते, अशी म्हणण्याची वेळ स्थानिकांवर आली असून याची दखल घेत महाविकास आघाडीने राज्याचे माजी मंत्री रमेश बंग यांच्या नेतृत्वात स्थानिक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांना निवेदन दिले.
 
समस्यांमध्ये प्रामुख्याने शहरांतर्गत असलेल्या रस्त्यांची दुरावस्था, गडर लाईनचे निकृष्ट दर्जाचे काम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा तर्फे होत असलेला दूषित पाणीपुरवठा, जागोजागी कचऱ्यांचे ढिगारे, शहरांतर्गत कोलमडलेली वाहतूक व्यवस्था, आर एल मध्ये होत असलेला घोटाळा, रहिवासी दाखला, शहरातील रस्त्यावर व निवासी भागात झालेले अतिक्रमण, निवासी भागात वाढत असलेली गोदामांची संख्या आदी समस्या स्थानिकांना भेडसावत आहे, त्या प्राधान्य क्रमाने मार्गी लावण्यासाठी निवेदन देण्यात आले.
 
शिष्टमंडळात ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक राजेश जयस्वाल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजीक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अश्विन बैस, जिल्हा महासचिव दुर्योधन ढोणे, तालुकाध्यक्ष प्रकाश कोकाटे, वाडी काँग्रेस शहराध्यक्ष शैलेश थोराणे,संजय जीवनकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष वसंतराव ईखनकर, माजी नगरसेवक श्याम मंडपे, वाडी कार्याध्यक्ष अमित हुसणापुरे, दिलीप दोरखंडे, शिवसेना हिंगणा विधानसभा संघटक प्रमुख संतोष केचे, तालुका प्रमुख संजय अनासाने, वाडी शहरप्रमुख मधु मानके पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख अखिल पोहनकर प्रामुख्याने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0