जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र; नितीन गडकरींचा ‘तो’ व्हिडिओ केला शेअर

18 Jul 2024 16:53:21

Jitendra Awhad criticizes CM Eknath Shinde
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या पूर्वंसंध्येला लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत १२वी उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्याला दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये तर पदवीधर तरुणांना दरमहा १० हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले.तसेच सोशल मीडियावर भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला.
 
आव्हाडांनी शेअर केलेला नितीन गडकरींचा व्हिडिओ हा त्यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमधला आहे. यात नितीन गडकरी सरकारी पैशातून वाटल्या जाणाऱ्या मोफत गोष्टींवर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. या देशातली वीज मंडळं १८ लाख कोटींच्या तोट्यात आहेत. जर आपल्या देशातील सरकारांमध्ये अशाच प्रकारे वीज मोफत देण्याची स्पर्धा राहिली, तर देशातलं वीज उत्पादन संपून जाईल. आपल्या देशात असं मिक्सर वाटणं, इडली पात्र वाटणं, इडल्या वाटणं वगैरे होताना दिसत आहे.
 
फुकटच्या गोष्टी सरकारच्या पैशातून वाटल्यामुळे राजकारण होत नाही. आपण रोजगार निर्माण करायला हवा. गरिबांना घरं बनवून द्यायला हवीत. स्वच्छ भारत निर्माण करायला हवा. देश कचरामुक्त करायला हवा. नवे उद्योग आणायला हवेत. लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा. देशाच्या विकासासाठीचे हे शाश्वत उपाय आपण करायला हवेत. निवडणुका जिंकण्यासाठी फक्त रेवडी वाटल्यामुळे देशाचं नुकसान होईल, अर्थव्यवस्थेचं नुकसान होईल व समाजाचंही नुकसान होईल, असं परखड मत नितीन गडकरींनी व्यक्त केले होते. यावर घरचा आहेर. कटू आहे पण सत्य आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून योजना लागू करणे म्हणजे राज्याचे नुकसान करणे असे गडकरी साहेब म्हणत आहेत, असं जितेंद्र आव्हाड या पोस्टमध्ये म्हणत आहेत.
Powered By Sangraha 9.0