भारतीय तटरक्षक दलाने केली भारतीय मासेमारी नौकेची सुटका; 11 कर्मचारीही सुखरूप

18 Jul 2024 14:00:54
Indian Coast Guard rescues Indian fishing boat
 (Image Source : Internet)
 
थिरुवनंतपूरम :
भारतीय तटरक्षक दलाने 17 जुलै 2024 रोजी एका समन्वित सागरी हवाई मोहिमेत मुसळधार पाऊस आणि आव्हानात्मक हवामानात केरळच्या कोचीपासून सुमारे 80 सागरी मैल अंतरावर अडकलेल्या ‘आशनी’ या भारतीय मासेमारी नौकेची आणि त्यावरील 11 कर्मचाऱ्यांसह यशस्वीरित्या सुटका केली. किल जवळील हुल फुटल्यामुळे या नौकेत पाणी शिरुन प्रॉपल्शन होऊ न शकल्यामुळे ही नौका संकटात होती आणि त्यामुळे यावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता.
 
16 जुलै 2024 रोजी रात्री सागरी देखरेखीवरील भारतीय तटरक्षक दलाच्या डॉर्नियर विमानाने संकटग्रस्त भारतीय मासेमारी नौका शोधून काढली. या नौकेला मदत करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालय क्रमांक 4 (केरळ आणि माहे) द्वारे भारतीय तटरक्षक दलाचे सक्षम हे गस्ती जहाज ताबडतोब त्या दिशेने वळवण्यात आले. या नौकेला वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाचे प्रगत हलके हेलिकॉप्टर तैनात असलेले आणखी एक जहाज ‘अभिनव’ हे मदतीसाठी पाठवण्यात आले.
 
भारतीय तटरक्षक दलाच्या तांत्रिक चमूने संकटात सापडलेल्या नौकेवर चढून त्यात पाणी भरण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आणि आवश्यक मदत केली. मासेमारी नौकेवरील सर्व कर्मचारी आणि नौकेची सुटका करून या मोहिमेची सांगता झाली.
 
त्यानंतर ही बोट मत्स्य विभागाच्या ताब्यात देण्यात आली. देशाच्या सागरी क्षेत्रांची सुरक्षा सुनिश्चित करण्याप्रति भारतीय तटरक्षक दलाची वचनबद्धता या मोहीमेने पुन्हा एकदा अधोरेखित केली.
Powered By Sangraha 9.0