नगर परिषद उर्दू हायस्कूलमध्ये सुविधा उपलब्ध करून द्या!

17 Jul 2024 21:54:22
- शाळा व्यवस्थापन समितीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
 
Urdu High School 
चांदूर रेल्वे :
चांदूर रेल्वे शहरातील नगर परिषद मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळेमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशा मागणीचे निवेदन शाळा व्यवस्थापन समितीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना सोमवारी दिले.
 
चांदूर रेल्वे शहरात नगर परिषदे अंतर्गत उर्दू माध्यमाची एकमेव माध्यमिक शाळा आहे. परंतु येथे काही भौतिक सुविधांचा अभाव आहे. शाळेत फक्त तीन वर्ग खोल्या, विज्ञान प्रयोगशाळा आणि मुख्याध्यापक कक्ष उपलब्ध आहे. मात्र आता शाळेत एक कार्यालय, एक ग्रंथालय, एक संगणक कक्ष, एक शिक्षक कक्ष, लॅब साठी एक रूम, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एक हॉल, असे एकूण सहा खोल्यांची आवश्यकता आहे. शाळेत डेक्स बेंच चांगल्या स्थितीत नसून कमीत कमी २० डेक्स बेंचची आवश्यकता आहे. तसेच शाळा इमारतीचे प्लास्टर जीर्ण झालेले असून जागोजागी स्वतःहून पडत आहे.
 
याशिवाय वर्ग खोल्यांमध्ये टाईल्स बसवण्याची गरज आहे. तसेच शाळेत इतर किरकोळ दुरुस्तीची गरजेची आहे. त्यामुळे विद्यार्थी हितासाठी शाळेला सहा खोल्या, डेस्क बेंच नगर परिषद फंडातून उपलब्ध करून देण्यात यावे तसेच किरकोळ दुरुस्ती करून देण्यात यावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नुरूलहसन कुरैशी, उपाध्यक्ष नाज परवीन, सदस्य फिरोज मुल्ला, नवाज अहमद, शे. गफ्फार, अकिला परवीन, सुलताना परवीन, मोहम्मद शहेजाद, सुमेध सरदार आदींनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. याची प्रतिलिपी माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांना देण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0