मित्रानेच गुप्तीने भोसकले

17 Jul 2024 21:57:02
 - पैशांच्या वादातून घडली घटना

murder(Image Source : Internet/ Representative) 
नागपूर :
नुकसान भरपाईवरून झालेल्या भांडणात एका तरुणाने आपल्याच मित्रावर गुप्तीने हल्ला केला. सपासप 15 वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. यात गंभीर जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. ही थरारक घटना सोमवारी रात्री गोधनी रेल्वे परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दीप हरी खरे (40) रा. कलेक्टर कॉलनी, गोधनी विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. प्रफुल महादेव दांडेकर (33) रा. आराधना सोसायटी, असे जखमीचे नाव आहे.
 
दीप आणि प्रफुल दोघेही मित्र आहेत. जवळपास दीड वर्षापूर्वी प्रफुलने काही कामानिमित्त दीपला त्याची मोटारसायकल मागितली होती. मात्र ती मोटारसायकल चोरी झाली. तेव्हापासून दीप त्याला मोटारसायकल भरून मागत होता. सोमवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास प्रफुल हा इब्राहिम शेख नावाच्या मित्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. काही वेळाने दीप हा सुद्धा तेथे आला. प्रफुलला पाहून त्याचा पारा चढला. थोड्या वेळात येतो असे म्हणून तो निघून गेला. याच्या काही वेळाने इब्राहिमच्या मोटारसायकलवर बसून प्रफुल घरी जाण्यासाठी निघाला. दीपने त्यांचा रस्ता अडवला. पैशांवरून वाद घालत गुप्ती काढली आणि प्रफुलच्या छाती व पाठीवर सपासप 15 वार केले. इब्राहित धावत-पळत प्रफुलच्या घरी गेला आणि त्याच्या भावाला घटनेची माहिती दिली. दोघेही घटनास्थळावर पोहोचण्यापूर्वीच दीप फरार झाला होता. प्रफुलला उपचारार्थ जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. पोलिसांनी इब्राहिमच्या तक्रारीवरून खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून दीपचा शोध सुरू केला आहे.
Powered By Sangraha 9.0