योगामुळे संधिवाताच्या (आरए) रुग्णांना मिळू शकतो आराम

    16-Jul-2024
Total Views |
Rheumatoid Arthritis
 (Image Source : Internet/ Representative)
 
नवी दिल्ली :
योगामुळे संधिवाताच्या (Rheumatoid Arthritis) रुग्णांच्या आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते, असे नवी दिल्लीतील एम्सने केलेल्या एका नवीन अभ्यासातून दिसून आले आहे.
 
संधिवात (र्ह्युमॅटाईड आर्थरायटीस) हा एक दीर्घकालीन तीव्र स्वयंप्रतिकार रोग आहे ज्यामुळे सांध्यामध्ये दाह होतो. मुळे सांध्याची क्षती होते आणि सांध्यात वेदना होतात. याशिवाय फुफ्फुस, हृदय आणि मेंदू यांसारख्या इतर अवयवांवर वाईट परिणाम होऊ शकतो. पूर्वापारपासून योग हा शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती राखण्यासाठी ओळखला जातो.
 
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे समर्थित, आण्विक पुनरुत्पादन आणि आनुवंशिकी प्रयोगशाळा, शरीरशास्त्र विभाग, तसेच नवी दिल्लीतील एम्स मधील संधिवातशास्त्र विभागाद्वारे एका संयुक्त अभ्यासात, संधीवाताच्या रूग्णांमध्ये पेशीय आणि आण्विक स्तरावर होणारे योगाचे परिणाम यांचा शोध घेण्यात आला. तसेच संधीवाताच्या रूग्णांना वेदना शमवण्याच्या पलीकडे जाऊन योगाचा कसा फायदा होऊ शकतो याचाही शोध घेण्यात आला.
 
योग पेशी स्तरावरचे नुकसान आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव (OS) नियंत्रित करून दाह कमी करतो, असे या अभ्यासात आढळून आले आहे. योग आण्विक स्तरावर, टेलोमेरेझ विकर आणि डीएनए दुरुस्ती तसेच पेशी जीवनचक्र नियमनात सामील असलेल्या जनुकांच्या क्रियाकलापांना चालना देऊन पेशींच्या वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करते.
 
डॉ. रिमा दादा आणि त्यांच्या चमूने आण्विक पुनरुत्पादन आणि आनुवंशिकी प्रयोगशाळा, शरीरशास्त्र विभाग, एम्स तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागा द्वारे समर्थित अभ्यासात, योग करत असलेल्या रुग्णांमध्ये वेदना कमी झाल्याची जाणीव, सांध्यांची सुधारलेली हालचाल, कमी झालेले पंगुत्व आणि जीवनाची एकूणच सुधारलेली गुणवत्ता आढळून आली आहे. रोगप्रतिकारक सहिष्णुता आणि आण्विक प्रतिसाद स्थापित करण्याच्या योगाच्या क्षमतेत या नव्या गुणविशेषांचा समावेश दिसून आला आहे.
 
सायंटिफिक रिपोर्ट्स, 2023 या नियतकालिकात प्रकाशित केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की संधीवाताच्या लक्षणासाठी ज्ञात उत्प्रेरक समजल्या जाणाऱ्या तणावाचे व्यवस्थापन करण्यात योगामुळे मदत होऊ शकते.
 
हे संशोधन संधीवाताच्या रुग्णांसाठी पूरक उपचार पद्धती म्हणून योगाच्या संभाव्यतेचा भक्कम पुरावा प्रदान करते. सांध्यांच्या वेदना आणि ताठरपणा यांसारख्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच रोग नियंत्रण आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यात देखील योग सहाय्य करू शकतो. औषधांच्या तुलनेत, योगाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. गंभीर स्वयंप्रतिकार स्थिती व्यवस्थापित करण्यासाठी योग एक स्वस्त,परवडणारा नैसर्गिक पर्याय म्हणून उपलब्ध आहे.