अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पवर गोळीबार; कानाला लागली गोळी

    15-Jul-2024
Total Views |
Shooting at former US President Donald Trump
 (Image Source : Internet)
 
अमेरिका :
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी खळबळजनक घटना घडली आहे. १३ जुलैला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपबलिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भर सभेत गोळ्या झाडून हल्ला करण्यात आला. पेनसिल्व्हेनियामध्ये निवडणूक सभेला संबोधित करत असताना हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात ट्रम्प ठोक्यात बचावले असले तरी त्यांच्या कानाला गोळी लागल्यामुळे त्यांच्या कानातून रक्तस्त्राव होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एफबीआय या घटनेची पुढील चौकशी करत आहे.
 
एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार, थॉमस मॅथ्यू क्रुक्स (वय २० वर्ष) असे हल्ला करणाऱ्याचे नाव आहे. एफबीआयच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे कार्यकारी सहाय्यक संचालक रॉबर्ट वेल्स यांनी याबाबत माहिती दिली. हा लोन वुल्फ अटैक असून हल्लेखोराने एकट्यानेच हे कृत्य केल्याचे तपासात आढळून आल्याचे त्यांनी सांगितले आहे. लोन वुल्फ अटैक हा दहशतवादी किंवा हिंसक हल्ला आहे, जो कोणत्याही बाहेरील संघटना किंवा गटाच्या समर्थनाशिवाय किंवा मदतीशिवाय स्वतंत्रपणे एका व्यक्तीद्वारे केला जातो. एफबीआयच्या म्हणण्यानुसार, शूटरने 5.56 मिमी एआर-स्टाईल रायफल वापरली. हल्ल्यामागचा हेतू निश्चित करण्यासाठी हल्लेखोराच्या सोशल मीडिया आणि इतर मालमत्तेची तपासणी अधिकारी करत आहेत.
 
दरम्यान, हल्लेखोराकडून या हल्ल्यात अनेकदा गोळीबार करण्यात आला होता. ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी लागल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. या गोळीबारात एकाचा मृत्यू देखील झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले. गोळीबारानंतर माजी राष्ट्रपतींना गुप्तहेर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ताफ्यात नेले. या घटनेचा अनेक स्तरावरून निषेध करण्यात येत आहे.
 
राष्ट्रपती जो बायडन यांनी हल्ल्याचे केला निषेध
 
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी हल्ल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही. त्याचा निषेध करण्यासाठी आपण एक राष्ट्र म्हणून संघटित झाले पाहिजे. आम्ही देशात अशा घटना घडू देणार नाही, असे म्हणत त्यांनी या घटनेचा निषेध केला.
 
एफबीआय अधिकाऱ्यांनी हल्ला का करण्यात आला यामागचे कारण अद्याप स्पष्ट सांगितले नसून त्यांनी हल्ल्याच्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांना मदत मागितली आहे. 'आम्हाला लोकांच्या मदतीची गरज आहे, जो कोणी घटनास्थळी होता, कोणीही काहीही पाहिले असल्यास कृपया एफबीआयला त्याची तक्रार करा,' असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.