- संतप्त जमावाकडून बसची तोडफोड
- सायन्स्कोर मैदानालगतची घटना
अमरावती :
अमरावतीकरांसाठी नेहमी वेळ बनून धावणारी शहरबस रविवारी काळ बनून धावली. या अनियंत्रीत बसने आजीचे बोट पकडून चालत असलेल्या 9 वर्षीय चिमुकल्याला निर्दयतेने चिरडले, तर तिच्या बहिणीला व आजीला गंभीर जखमी केले. सकाळी १०.१० वाजताच्या कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील सायन्सकोर प्रांगणाच्या प्रवेशद्वारासमोर हा हृद्यद्रावक घटना घडली. अपघातानंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड केली. शहर बसने चिरडल्याची गेल्या वर्षभरातील ही तिसरी घटना आहे.
प्रितम गोविंद निर्मळे (९) असे मृत तर वैष्णवी संजय निर्मळे (१२) असे जखमीचे नाव आहे. चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील रहिवासी नर्मदा लक्ष्मणराव निर्मळे (६०) या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रविवारी सकाळी नातू प्रितम, नाती वैष्णवी व नेहा संतोष निर्मळे (१४) यांच्यासह एसटी बसने अमरावतीला आल्या. येथील मध्यवर्ती बसस्थानकावर उतरल्यावर ते सर्व सायन्सकोर प्रांगणाच्या द्वारासमोरून रुक्मिणीनगर चौकाकडे धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनस्थळी जात होते. त्यावेळी मागून आलेल्या शहर बस क्रमांक एमएच २७ ए ९९५२ ने अचानक प्रितम व वैष्णवीला धडक दिली. या अपघातात प्रितम हा बसच्या चाकाखाली आला. त्यात चिरडून त्याचा मृत्यू झाला. तर वैष्णवी ही जखमी झाली.
नागरिकांना राग अनावर
डोळ्यादेखत नातू गतप्राण झाल्याचे दिसताच आजी नर्मदा यांनी एकच आक्रोश केला. त्या आक्रोशाने प्रत्यक्षदर्शींचे मन देखील हेलावले. त्यामुळे संतप्त जमावाने बसची चांगलीच तोडफोड केली. त्यामुळे तणाव देखील निर्माण झाला. माहिती मिळताच कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पोलिसांनी जखमी वैष्णवीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून प्रितमच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी शहर बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
विना मेटंनन्स धावताहेत शहर बस?
प्रकरणाची सावरासावर करण्याकरिता ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचे चालकाकडून पोलिसांना सांगण्यात आले. याचा अर्थ या शहर बसेस विना मेंटनन्स शहरा जीवंत बॉम्ब बनुन धावताहेत की, काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. व्हिएमव्ही महाविद्यालयाच्या गेटवर एका तरुणीला चिरडल्याची घटना, राजापेठ एका तरुणाला धडक दिल्याची घटना अजून विस्मरणात गेलेली नसताना आता ही चिमुकल्याला चिरडण्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. याप्रकरणी बस संचालन करणा:या कंपनीवरच कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.