Blog : 'गंभीर' पर्वास सुरुवात

    15-Jul-2024
Total Views |

Gautam Gambhir
 (Image Source : Internet)
 
Beginning of the Gautam Gambhir period | वेस्ट इंडिज मध्ये झालेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवून देताच भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वास्तविक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ मागील वर्षीच संपला होता. मात्र टी २० विश्वचषकापर्यंत त्यांना प्रशिक्षकपदी कायम ठेवण्यात आले होते. त्यांनीही देशाला विश्वविजयी करून त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला. राहुल द्रविड यांच्या नंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक कोण असतील, याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली. अर्थात प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांचेच नाव चर्चेत होते आणि अपेक्षेप्रमाणे त्यांचीच या पदासाठी निवड झाली.
 
यावर्षी कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएलची विजेतेपद पटकवताच गौतम गंभीर यांच्या नावाची चर्चा प्रशिक्षकपदासाठी होऊ लागली. कारण ते प्रशिक्षक असलेल्या संघांनी सलग दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. मागील वर्षी गुजरात टायटन या संघाने विजेतेपद पटकावले. त्या संघाचे गौतम गंभीर हे प्रशिक्षक होते. यावर्षी कोलकाता संघाने विजेतेपद पटकावले, या संघाचे प्रशिक्षकही गौतम गंभीर हेच होते. गौतम गंभीर यांनी आखलेल्या रणनीती मुळेच हे संघ आयपीएलचे विजेतेपद पटकावू शकले. शिवाय ते कोलकाता संघाचे कर्णधार असताना या संघाने दोनदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. या विजेतेपदात गौतम गंभीर यांचा मोलाचा वाटा होता. त्यांना जर भारतीय संघाचे प्रशिक्षक बनवले, तर त्याचा भारतीय संघाला मोठा फायदा होईल, असा विचार करून बीसीसीआयने त्याची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली. अर्थात गंभीर या पदासाठी सर्वार्थाने योग्य आहेत.
 
वयाच्या दहाव्या वर्षापासून गौतम गंभीर यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याने वयाच्या २२ व्या वर्षीच त्यांची भारतीय क्रिकेट संघात निवड करण्यात आली. भारतीय संघात निवड होताच अल्पावधीतच त्यांनी सलामीचा भरवशाचा फलंदाज म्हणून नाव लौकीक मिळवला. वीरेंद्र सेहवाग सोबत त्यांची सलामीची जोडी जमली की प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या तोंडाला फेस येत असे. गौतम गंभीरने भारताला दोन विश्वचषक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्यांनी फटकावलेल्या ९७ धावामुळेच भारत विश्वविजेता बनू शकला. विशेष म्हणजे सचिन, सेहवाग ही सलामीची जोडी स्वस्तात बाद झाल्यावर त्यांनी जी संयमी खेळी केली त्याला तोड नाही. त्यांनी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोबत केलेली भागीदारी निर्णायक ठरली.
 
२००७ साली झालेल्या टी २० चा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही गौतम गंभीरने सर्वाधिक ७५ धावा करून भारताला विश्वविजय मिळवून दिला होता. त्यांच्या या दोन्ही खेळ्या क्रिकेट रसिकांच्या मनात कोरल्या गेल्या आहेत. २०१८ साली वयाच्या ३७ व्या वर्षी त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. त्यांना आपली क्रिकेट कारकीर्द आणखी वाढवता आली असती परंतु नवीन खेळाडूंच्या मार्गात आपण अडथळा ठरू नये म्हणून त्यांनी निवृत्ती स्वीकारली.
 
गौतम गंभीर हे एक संवेदनशील मनाचे गृहस्थ आहेत. केवळ क्रिकेटपटू म्हणूनच नव्हे तर व्यक्ती म्हणूनही ते महान आहेत त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा भार ते सांभाळीत आहेत. गोरगरिबांच्या मुलांना मोफत अन्न मिळावे यासाठी त्यांनी दिल्लीत अन्नछत्र चालू केले असून तिथे शेकडो गोरगरीब आपली भूक भागवतात. आता त्यांची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावर निवड झाल्यानंतर त्यांच्याकडून क्रिकेट रसिकांच्या खूप अपेक्षा आहेत. आपल्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीत त्यांनी भारतीय संघाला आयसीसीचे विजेतेपद मिळवून द्यावे अशी अपेक्षा क्रिकेट रसिक त्यांच्याकडून व्यक्त करीत आहेत. पुढील वर्षी चॅम्पियन ट्रॉफी आणि कसोटी चॅम्पियनशिप अशा दोन मोठ्या स्पर्धा होणार आहेत. या दोन्ही स्पर्धा त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या काळात भारताने जिंकाव्यात अशी अपेक्षा आहे.
 
गौतम गंभीर हे उत्तम रणानितिकार आहेत. त्यांनी आखून दिलेल्या रणनीतीप्रमाणे खेळाडूंनी खेळ केल्यास भारत नक्कीच या स्पर्धा जिंकू शकेल. पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यापासून ते आपला पदभार स्वीकारतील म्हणजेच श्रीलंका दौऱ्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये गंभीर पर्वास सुरुवात होईल. या गंभीर पर्वात भारतीय संघ ऐतिहासिक कामगिरी करून भारताचा तिरंगा जगभर डौलाने फडककवेल यात शंका नाही. भारतीय संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा!
 
 

श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.