लिट्ल मास्टरला अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा!

    10-Jul-2024
Total Views |
Happy amrit mahotsav birthday to little master
 (Image Source : Internet)
 
क्रिकेट हा आज सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. भारत हा आज क्रिकेटमधील दादा संघ आहे मात्र सत्तरच्या दशकापर्यंत भारत हा क्रिकेटमधील लिंबूटिंबू संघ समजला जात होता. त्या काळी फक्त कसोटी क्रिकेट खेळले जायचे भारताने कसोटीत विजय मिळवला ही मोठी बातमी असायची. भारताने कसोटीत विजय मिळवला ही बातमी दुर्मिळ असायची. भारताला जो विजय मिळायचा तो अर्थात भारतातच मिळायचा. भारताबाहेर परदेशात विजय मिळणे ही अशक्यप्राय गोष्ट समजली जायची. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज हे त्या काळातील दादा संघ. त्यांना त्यांच्या देशात जाऊन हरवायचे ही अशक्यप्राय गोष्ट समजली जायची. अशीच अशक्यप्राय गोष्ट भारताने शक्य केली ती १९७१ साली.
 
१९७१ साली भारताचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला होता. त्या संघात एक छोट्या चणीचा मराठी मुलगा भारतीय संघात प्रथमच खेळत होता. त्याची ती पहिलीच कसोटी मालिका. समोर वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांचा तोफखाना. हा छोट्या चणीचा मुलगा सलामीला खेळायला गेला. नुसताच खेळायला गेला नाही तर तो खेळाला असा खेळला की त्याने आपल्या पहिल्याच कसोटी मालिकेत विश्वविक्रम केला. आपल्या पहिल्याच कसोटी मालिकेत ते ही वेस्ट इंडिजच्या तोफखान्यासमोर त्याने विक्रमी ७७४ धावा काढल्या. त्याचा हा विश्वविक्रम अजूनही कोणत्या खेळाडूला मोडता आला नाही हे विशेष. त्याच्या या विक्रमी फलंदाजीने भारताने पहिल्यांदाच वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिजमध्ये हरवले आणि या छोट्या चणीच्या मराठी मुलाची दखल जगाने घेतली. आपल्या पहिल्याच मालिकेत विक्रमी धावा काढणारा हा मुलगा होता सुनील मनोहर गावस्कर. हो तोच सुनील गावस्कर जो पुढे जाऊन भारतीय संघाचा आधारस्तंभ बनला. ज्याने अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली. ज्याने डॉन ब्रॅडमन यांच्या २९ शतकांच्या शतकी खेळीचा विक्रम मोडून ३४ शतके काढली.
 
कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पार करणारा जो पहिला खेळाडू ठरला. ज्याने आपल्या देशाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले त्याच सुनील गावस्कर यांचा आज ७५ वा वाढदिवस. १० जुलै १९४९ रोजी मुंबईत जन्मलेले सुनील गावस्कर हे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम आघाडीचे फलंदाज म्हणून ओळखले जातात. १९७१ ते १९८७ असे सतरा वर्ष त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले या दरम्यान त्यांनी १२५ कसोटी सामन्यात ५१.१२ च्या सरासरीने १०,१२२ धावा काढल्या. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, न्यूझीलंड अशा सर्वच संघाविरुद्ध त्यांनी खोऱ्याने धावा काढल्या. त्या काळातील गोलंदाज आजच्या सारखे नव्हते. आग ओकणारे गोलंदाज होते. वेस्ट इंडीजचे अँडी रॉबर्ट्स, जोएल गार्नर, माल्कम मार्शल, मायकल होल्डींग, पॅट्रिक पॅटरसन, इंग्लंडचे बॉब विलिस, जॉन स्नो, इयान बॉथम, पाकिस्तानचे इम्रान खान, सरफराज खान, ऑस्ट्रेलियाचे जेफ थॉमसन, डेनिस लिली केवळ नाव घेतले तरी थरकाप उडतो. हे गोलंदाज नव्हते तर फलंदाजांचे कर्दनकाळ होते. त्यांच्या समोर धावा काढणे तर दूरच पण उभे राहणे देखील मुश्कील होते. अशा खुंखार गोलंदाजांसमोर सुनील गावस्कर खोऱ्याने धावा काढत असे ते त्यांच्या तंत्रशुद्ध फलंदाजीच्या जोरावर.
 
सुनील गावस्कर यांची गणना क्रिकेटच्या इतिहासात सर्वात तंत्रशुद्ध फलंदाज अशी केली जाते. ते फलंदाजीस उतरत तेंव्हा पायाला पॅड आणि हातात ग्लोज एव्हढेच सुरक्षेचे साधने घालून. सुनील गावस्कर यांनी हेल्मेट कधीही वापरले नाही ते कायम डोक्यावर स्कल कॅप घालायचे. स्कल कॅप घालूनच त्यांनी त्या काळातील वेगवान गोलंदाजांचा सामना केला आणि खोऱ्याने धावा काढल्या. या दरम्यान त्यांना लिटल मास्टर पदवी मिळाली. आजही त्यांच्या नावापुढे लिटिल मास्टर असेच लिहिले जाते. या दरम्यान त्यांनी भारतीय संघाचे कर्णधारपदही सांभाळले.
 
१९८३ चा विश्वचषक जिंकून देण्यातही त्यांचा मोलाचं वाटा होता. ते केवळ उत्कृष्ट फलंदाजच नव्हते तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकी होते. त्यांनी कसोटीत १०० हून अधिक झेल टिपले. यष्टिरक्षक सोडून कसोटीत १०० हून अधिक झेल घेणारा पहिला भारतीय होण्याचा मान त्यांनाच मिळाला. कसोटीतील त्यांच्या अद्वितीय कामगिरीमुळे १९८० मध्ये त्यांना विस्डेन या क्रिकेटमधील प्रसिद्ध मासिका तर्फे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले. त्यांच्या क्रिकेटमधील कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. निवृत्तीनंतर त्यांनी सनी डेज, रन्स अन् रुईंस व वन डे वंडर ही तीन पुस्तके लिहिली. आज ते समालोचन आणि स्तंभलेखन करतात. आज त्यांची पंच्याहत्तरी म्हणजेच आज त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस. सुनील गावस्कर यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! त्यांना निरोगी आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. 
Happy birthday little master!
 
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत