इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो!

    01-Jul-2024
Total Views |
 
 

avoid ida pida and may the kingdom of bali come
 (Image Source : Internet/ Representative)
 
१ जुलै हा हरितक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिन. त्यांच्या जन्मदिनानिमीत्त १ जुलै हा दिवस संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीही तो कृषी दीन म्हणून संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा केला गेला. स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्यामुळेच देशात हरितक्रांती होऊ शकली. स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या याच योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने १ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला गेला.
 
शेती ही फार पुरातन काळापासून चालत आली आहे. शेती हाच आपला मुख्य व्यवसाय आहे. देशातील ७० टक्के लोक शेतीच करतात. राज्यात शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्याला खूप महत्वाचे स्थान होते. दिवाळीच्या सणाला प्रत्येक घरात शेतकऱ्यांसाठी प्रार्थना केली जायची. ईडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो असा आवाज घराघरांतून ऐकू यायचा. हा आवाज आता कुठे तरी लुप्त होऊ लागला आहे. अनेक सामस्यांनी ग्रासलेल्या शेती आणि शेतकऱ्यांसाठीचा हा आवाज पुन्हा कसा घुमेल यासाठी आजच्या कृषिदिनापासूनच प्रयत्न करायला हवेत. आज शेतीची आणि शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. आस्मानी आणि सुलतानी संकटांनी बळीराजा पिचला आहे.
 
शेतकरी हा शब्द बोलायला जेवढा सोप्पा आहे तेवढा सोप्पा नाही. शेती करताना अचानक येणाऱ्या संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यात बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, गारपीट, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँक, पतसंस्था इत्यादींकडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत, निर्यातीत होणारे शासकीय बदल या व अशा सर्व संकटाला शेतकरी सामोरे जात असतो. हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतीतील पिकांचे नुकसान होते. हजारो - लाखो रुपये खर्च करून शेतकरी आपला शेतीमाल तयार करतो. त्याची काळजी घेतो. पण त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळतेच असे नाही. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी बळीराजाचा हातचा घास हिरावला जातो. शासन दरबारीही त्याची दखल घेलती जात नाही. कर्जाच्या बोझ्याखाली अडकून बळीराजा आत्महत्या करतो.
 
महाराष्ट्रासारख्या कृषिप्रधान राज्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना कोणी वाली नाही अशी भावना शेतकऱ्यांची झाली आहे. हे चित्र बदलायला हवे. पुन्हा एकदा इडा पीडा टळो बळीचे राज्य येवो हा आवाज घराघरातून घुमायला हवा यासाठी आजच्या कृषिदिनापासून प्रयत्न करायला हवेत. आजच्या कृषी दिवसाच्या निमित्ताने तमाम शेतकरी बांधवांना कृषिदिनाच्या शुभेच्छा!
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.