नारायणपूर - दंतेवाडा सीमा भागातील चकमकीत सात नक्षलवादी ठार

    08-Jun-2024
Total Views |

seven naxalites killed in encounter in narayanpur dantewada border area
(Image Source : Internet/ Representative) 
 
नारायणपूर, छत्तीसगड :
नारायणपूर, दंतेवाडा आणि कोंडागावच्या आंतरजिल्हा सीमेवर जिल्हा राखीव गट आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत आतापर्यंत सात नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्याकडून शास्त्रे जप्त करण्यात आली आहे.
 
नारायणपूरचे पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 'नक्षलवाद्याजवळील शस्त्रे जप्त केली असून चकमकीच्या ठिकाणाहून सात नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. या चकमकीत जखमी झालेल्या तीन नारायणपूर डीआरजी जवानांना पूर्व बस्तर विभागातील गोबेल भागातून रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
 
६ जूनच्या रात्रीपासून नारायणपूर, दंतेवाडा, कोंडागाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील पूर्व बस्तर विभागांतर्गत मुनगेडी, गोबेल भागात नक्षलवाद्यांविरोधात आंतर-जिल्हा संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान गोबेल परिसरातील जंगलात ७ जून रोजी दिवसभर पोलीस दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती, असेही नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार यांनी सांगितले आहे.
 
नक्षलवादाचा सामना करण्यासाठी सरकारने निर्णायक पावले उचलली आहेत. येत्या दोन ते तीन वर्षांत देश या समस्येपासून मुक्त होईल. भाजप सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे वंचित असलेल्या आदिवासी भागात कल्याणकारी योजना पोहोचल्या आहेत. झारखंड, बिहार, तेलंगणा, ओडिशा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त असून छत्तीसगडमधील तीन-चार जिल्ह्यांमध्ये ही समस्या कायम असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हंटले होते.