लोकशाहीचा विजय

    07-Jun-2024
Total Views |
 
 victory of democracy
(Image Source : Internet/ Representative)
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव अर्थात लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली आणि या लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर झाला. देशातील जवळपास १०० कोटी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात हिरीरीने भाग घेऊन आपला लोकप्रतिनिधी अर्थात खासदार निवडला. या निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीए आणि काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडी यांच्यात मुख्य लढत झाली.
 
निवूडणूकपूर्व आणि निवडणुकीनंतर विविध माध्यमांनी केलेल्या सर्व्हेत भाजप प्रणित एनडीएला ३५० जागा मिळण्याचा आणि भाजपला ३०० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. अनेक जाणकारांनी देखील तसाच अंदाज व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्ष हाती आलेला निकाल हा सर्वांना अचंबित करणारा ठरला आणि एकट्याच्या जोरावर बहुमतात येण्याची स्वप्न पाहणाऱ्या भाजपला २४० जागाच मिळाल्या. तर मित्र पक्षांसह भाजप कसाबसा बहुमताचा आकडा पार करू शकला. ज्या काँग्रेसला आणि इंडियाला कोणीच जमेस धरले नव्हते, त्या काँग्रेसने जवळपास १०० जागा जिंकल्या तर इंडिया आघाडीने २४० जागा जिंकून सर्वांना अचंबित केले अर्थात असा निकाल लागेल असा अंदाज जरी जाणकारांना नसला तरी मतदारांच्या बोलण्यातून असाच कौल येईल असे वाटत होते. कारण सरकारच्या मागच्या पाच वर्षाच्या कामगिरीवर मतदार नाराज होते.
 
शेतकरी, तरुण महिलांमध्ये मोदी सरकारच्या धोरणावर प्रचंड नाराजी दिसत होती, त्यात भाजपने जो यंत्रणांचा गैरवापर केला. त्यामुळेही मतदार चिडून होता. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षात भाजपने पाडलेली फूट देखील मतदारांना आवडली नाही. २०१४ साली मोदींनी ना खाऊंगा... ना खाने दुंगा... हा दिलेला नारा मतदारांना भावला होता. मोदी साहेब देशातील भ्रष्टाचार उखडून टाकतील आणि भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवतील असा विश्वास मतदारांना होता. मात्र भाजपने आणि खुद्द मोदींनी ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्याच भ्रष्ट नेत्यांना भाजपने आपल्या पक्षात प्रवेश देऊन पावन करून घेतले हे मतदारांना रुचले नाही. मोदी सरकारचे शेती विषयक धोरण शेतकऱ्यांना मान्य नव्हते हे ही निकालातून स्पष्ट झाले.
 
देशात प्रचंड बेरोजगारी आहे. तरुणांच्या हातात उच्च शिक्षण घेतल्याची डिग्री आहे मात्र रोजगार नाही विशेष मागील पाच वर्षात रोजगार वाढवण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल सरकारकडून उचलले गेले नाही याचाही फटका भाजपला बसला. महागाई रोखण्यात मोदी सरकार अपयशी ठरले त्याचेही प्रतिबिंब निकालात उमटले. भाजपच्या उत्तर भारतातील काही नेत्यांनी ४०० पार झालो तर घटना बदलू अशी आत्मघातकी विधाने केली ती विधाने सोशल मीडियावर व्हायरल देखील झाली. कारण नसताना भाजपच्या काही बोलबच्चन नेत्यांनी केलेली अशी विधाने भाजपच्या अंगलट आली या आणि अशा अनेक कारणांनी जनतेच्या मनात भाजप विषयी नाराजी निर्माण झाली. जनतेच्या मनात आपल्या विषयी नाराजी आहे याची कल्पना भाजपमधील धुरिणांना आली होती, म्हणूनच भाजपने प्रचार अन्य मुद्द्यांवर भरकटवण्याच्या प्रयत्न केला. मात्र मतदारांनी त्याकडे लक्ष न देता मतदान केले या सर्वांचा परिपाक म्हणजे ४०० पार ची स्वप्ने पाहणारा भाजप ३०० पार ही होऊ शकला नाही.
 
सरकार विषयी जनतेच्या मनातील ही नाराजी काँग्रेसने हेरली. राहुल गांधींनी देशभर भारत जोडो यात्रा काढून जनतेला विश्वास दिला. स्वतः कमीपणा घेऊन इंडिया आघाडीतील घटक पक्षांना मोठेपणा दिला. अनेक राज्यात मुख्यपक्ष असूनही मित्र पक्षांना अधिक जागा देऊन दुय्यम स्थान स्वीकारले. इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसने सर्वात कमी जागा लढवल्या हे करताना मित्र पक्षांचा मान सन्मान राखला. त्यामुळे इंडिया आघाडी शेवटपर्यंत एकत्र राहिली त्याचा फायदा त्यांना झाला. ज्या इंडिया आघडीला दीडशे जागाही मिळणार नाही असे म्हंटले जात होते त्या इंडिया आघडीने २४० जागा मिळवल्या.
 
मागील दहा वर्षात देशात विरोधीपक्ष नाममात्र देखील नव्हता आता मात्र देशाला विरोधी प्रबळ पक्ष मिळाला आहे. प्रबळ विरोधी पक्ष असणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. प्रबळ विरोधी पक्ष असल्यास सरकारला मनमानी करता येत नाही. मागील दहा वर्षात भाजपने जशी मनमानी केली तशी त्यांना यावेळी करता येणार नाही. आता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील तर राहुल गांधी विरोधीपक्षनेते बनतील. दोघानीही आपल्या पदाची प्रतिष्ठा राखून आपली जबाबदारी पूर्ण केली तर भारताची लोकशाही आणखी सुदृढ होईल आणि जनतेचा लोकशाहीवरील विश्वास आणखी वाढेल. या निवडणुकीत कोण जिंकले कोण हरले असे जर कोणी विचारले तर माझे उत्तर असेल या निवडणुकीत कोणीही जिंकले नाही कोणीही हरले नाही. या निवडणुकीत जिंकली ती भारताची लोकशाही. ही लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम या देशातील मतदारांनी केले त्याबद्दल या १०० कोटी मतदारांचे मनापासून आभार आणि जिंकून आलेल्या सर्व पक्षांच्या सर्व खासदारांचे मनापासून अभिनंदन! आता झाले गेले विसरून सर्वांनी एकत्र येऊन भारताला महाशक्ती बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली तर भारत भविष्यात नक्कीच महाशक्ती बनेल यात शंका नाही.
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.