अटकेची धमकी देऊन उकळले 4.80 लाख

07 Jun 2024 16:54:27
 
- सायबर गुन्हेगाराने केली पोलिस अधिकारी असल्याची बतावणी

4 80 lakhs extorted under threat of arrest
 (Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
सायबर गुन्हेगाराने पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून खोट्या गुन्ह्यात अटकेची धमकी देत एका व्यक्तीला 4 लाख 80 हजार रुपयांचा चुना लावला. ही घटना अंबाझरी पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली आहे. पोलिसांनी मननप्रसाद ताराचंद भोंडेकर (56) रा. रवीनगरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.
 
गत 30 एप्रिल रोजी सकाळी 10.45 वाजताच्या सुमारास भोंडेकर यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्याने मुंबई सायबर गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याची बतावणी केली. त्याने भोंडेकर यांना, तुमच्या नावाने मुंबईच्या अंधेरीत एक खाते उघडण्यात आले असून त्यात 25 लाख रुपये जमा झाले असल्याची माहिती दिली. तसेच ती रक्कम अंमली पदार्थांच्या तस्करीची असल्याने तुमच्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात अटकेपासून वाचायचे असेल तर पैसे द्यावे लागतील, असे सांगितले.
 
घाबरलेल्या भोंडेकर यांनी आरोपीने सांगितल्यानुसार हैदराबाद येथील एका बँक खात्यात 4.80 लाख रुपये जमा केले. अशाच प्रकारची दुसरी घटना समोर आल्याने भोंडेकर यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी प्रकरणाची तक्रार अंबाझरी पोलिसात केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
 
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
 
मेडिकल इमरजन्सी, वीज बिल, आर्थिक आमिष, गुन्हे शाखा, सायबर पोलिस आदींच्या नावाने ठकबाज लोकांना फोन करून जाळ्यात अडकवतात. अशा प्रकारचा फोन करणाऱ्यांपासून सावध रहा. अशा प्रकारचा फोन आल्यास सर्वप्रथम जवळच्या पोलिस ठाण्याच्या संबंधित विभागात जाऊन चौकशी करा, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0