सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

    03-Jun-2024
Total Views |

 
call for registration for subroto mukherjee football tournament
 (Image Source : Internet/ Representative)
 
बुलडाणा:
सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेसाठी पात्र खेळाडूंनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. क्रीडा स्पर्धेचे आयोजन 4 ते 6 जुलै दरम्यान करण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने तसेच सुब्रतो मुखर्जी स्पोटर्स् एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली यांच्यातर्फे सन 2024-25 या वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप (सबज्युनिअर मुले, ज्युनिअर मुले/मुली) या क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम क्रीडा संचालनालय, पुणे यांना प्राप्त आहे.
 
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा अंतर्गत सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंकरीता सबज्युनिअर 15 वर्षाआतील मुले क्रीडा स्पर्धा मुले वयोगटासाठी 1 जानेवारी 2010 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच ज्युनिअर 17 वर्षाखालील मुले व मुली 1 जानेवारी 2008 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
 
जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनिअर, ज्युनिअर क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागापूर्वीच subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू आणि संघांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा नगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथे ऑफलाईन नोंदणी दि. 29 जून 2024 पर्यंत करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूंकडे जन्मदाखला, आधारकार्ड व पासपोर्ट सर्व मूळ प्रतीत असणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. यात खेळाडू अधिक वयाचा दाखला आढळल्यास संपूर्ण संघ बाद करण्यात येणार आहे.
 
स्पर्धांचे आयोजन हे 15 वर्षाआतील मुले सबज्‍युनिअर4 जुलै 2024, 17 वर्षाआतील मुले ज्युनिअर 5 जुलै 2024, 17 वर्षाआतील मुली ज्युनिअर 6 जुलै 2024 करण्यात येणार आहे. प्रवेश अर्जावर खेळाडूचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, वर्ग, आधार क्रमांक, शाळेचे नाव, पत्ता, शाळेचा युडायस क्रमांक, खेळाडू स्वाक्षरी, रजिस्टर क्रमांक, मोबाईल क्रमांक, संस्था प्रमुख, मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने पाठवावे. 15 वर्षाआतील खेळाडूंकरीता वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे.
 
जिल्ह्यातील शाळा, संघांनी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑफलाईन नोंदणी करावी आणि subrotocup.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन शाळांनी सहभागी व्हावे, याबाबत अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांच्याशी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.