आषाढी यात्रेसाठी प्रशासन सज्ज; वारकऱ्यांसाठी ६५ एकर जागा आरक्षित

28 Jun 2024 13:47:47
Administration ready for Ashadhi Yatra
 (Image Source : Internet)
 
सोलापूर :
आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांना पंढरीच्या वारीची ओढ लागते. वारकऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी असलेला मोठा उत्सव आषाढी एकादशी १७ जुलै रोजी साजरा होत असते. अवघ्या काही दिवसातच संपूर्ण पंढरपूर नगरी विठुराया आणि रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या वारकरी आणि भाविकांनी भरलेली दिसेल. या उत्सवासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून टाळ-चिपळ्यांच्या गजरात पालखी-दिंड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. दरम्यान, विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक पंढरपूरला येत असतात, त्यामुळे प्रशासनाने ६५ एकरावरील भक्तिसागर येथे वारकऱ्यांच्या मोफत निवासासाठी जागा आरक्षित करण्याचे आवाहन केले आहे.
 
प्रशासनाने काही वर्षांपूर्वी चंद्रभागेच्या काठावर असणाऱ्या ६५ एकर जागेत 'भक्तिसागर' हा शहरातील सर्वात मोठा सुसज्ज निवास वारकऱ्यांच्या सोयीसाठी तयार केला आहे. याठिकाणी ४९७ मोकळे प्लॉट असून वारकरी तंबू टाकून निवास करत असतात. या ठिकाणी भाविकांना शुद्ध पाणी, डांबरी रस्ते, वीज, स्वच्छतागृहे, दवाखाने, पोलिस व्यवस्था, अग्निशामक यंत्रणेची सुविधा उपलब्ध आहे. नेहमीप्रमाणे यावर्षीही आरोग्य विभागाकडून चौथे महाआरोग्य शिबीर घेतले जाणार असून अनेक भाविकांना सर्वच प्रकारच्या उपचाराचा लाभ घेता येणार आहे.
 
आषाढी यात्रेत दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरला येत असतात, त्यामुळे त्यांचा निवासाचा प्रश्न येत असतो. त्यामुळे प्रशासनाने ६५ एकर जागेवर आरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी आधी अर्ज करावा लागणार असून ज्यांचे अर्ज आधी येतील, त्यांना जागा दिली जाणार असल्यामुळे तातडीने अर्ज देऊन गैरसोय टाळण्याचे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0