(Image Source : Internet)
आज २३ जून, आपल्या मधुर आवाजाने रसिकांच्या हृदयात स्थान मिळवणारे अजरामर लोक गायक प्रल्हाद शिंदे (Legendary folk singer Prahlad Shinde) यांचा स्मृतिदिन. प्रल्हाद शिंदे यांना भक्ती गीतांचा बादशहा म्हंटले जाते कारण त्यांनी गायलेली सर्व भक्तिगीते लोकप्रिय झाली. केवळ भक्तिगीते नाही तर भावगीते, कव्वाली आणि कोळी गीतांवर देखील ठसा उलटवला. सर्व प्रकारची लोक गीते गाण्याचा आणि ती लोकगीते लोकप्रिय करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली सर्व गाणी लोकप्रिय झाली.
महाराष्ट्रात कोणताही सण उत्सव असो त्यांनी गायलेली गाणी वाजवल्या शिवाय तो सण उत्सव पूर्ण होतच नाही. मग तो गणपती उत्सव असो की नवरात्र उत्सव, आषाढी एकादशी असो की सत्यनारायणाची महापूजा, आंबेडकर जयंती असो की बुद्ध पौर्णिमा इतकेच काही गावातील संदल उरूस देखील त्यांच्या कव्वाली शिवाय पूर्ण होत नाही कारण त्यांनी गायलेली ऐका सत्य नारायणाची कथा, चल ग सखे पंढरीला, बाप्पा मोरया रे, उड जायेगा एक दीन पंछी रहेगा पिंजरा खाली.... अशी गायलेली शेकडो गाणी आजही लोकप्रिय आहे. ही गाणी अजरामर आहेत. ही गाणी ऐकली नाहीत असा एकही माणूस महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वानाच ही गाणी तोंडपाठ आहेत. केवळ हीच नाही तर यासारखी शेकडो लोकप्रिय गाणी गाऊन त्यांनी रसिकांच्या ह्रुदयात स्थान मिळवले आहे.
१९३३ साली अतिशय गरीब कुटुंबात अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथे त्यांचा झाला. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने प्रल्हाद शिंदे यांचा परिवार ते लहान असतानाच मुंबईत आले. गोड गळ्याची दैवी देणगी लाभलेल्या प्रल्हाद शिंदे यांनी लहान वयातच मुंबईच्या रस्त्यांवर रेल्वे स्टेशनवर गाणी गायला सुरुवात केली. त्यांची आई भाऊ व बहिणीही गाणी गाऊन त्यांना साथ देऊ लागली. त्यातून त्यांचा उदरनिर्वाह होऊ लागला. अतिशय गरीब घराण्यात जन्म घेतलेला, बहुजन समाजात जनमलेला, गायनाचे किंवा संगीताचे कोणतेही शिक्षण न घेतलेल्या प्रल्हाद शिंदे यांचा आवाज मुंबईत लोकप्रिय होऊ लागला. त्यांची गाणी जशी लोकप्रिय होऊ लागली तशी त्यांच्या आवाजाची जादू महाराष्ट्रभर पसरू लागली. गावागावातून त्यांना गाणी गाण्यासाठी बोलावणे येऊ लागले. नवरात्र उत्सव, आंबेडकर जयंती, गावातील यात्रा, जत्रा, बुद्ध पौर्णिमा, संदल - उरूस अशा कार्यक्रमात त्यांना बोलावणे येऊ लागले. त्यांची गाणी ऐकण्यासाठी लोक लांबून लांबून येऊ लागली. पाहता पाहता त्यांचा आवाज महाराष्ट्रभर पसरला. महाराष्ट्रातील ते सर्वाधिक मागणी असलेले गायक बनले. उभ्या महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावल्यासारखे ते गाण्यासाठी भटकले. त्यामुळे त्यांनी माणसे जोडली आणि ते जाती धर्माच्या पलीकडे जाऊन पोहचले.
प्रल्हाद शिंदे आपल्या गाण्याच्या कार्यक्रमाचा शेवट नेहमी एका आगळ्या वेगळ्या गीताने करीत. त्यांनी सर्व प्रकारची गाणी गायली. भजन, कीर्तन, लोकगीते, बुद्ध धर्माची गाणी, डॉ बाबासाहेबांची गाणी त्यांनी घराघरात पोहचवली. त्यांची गाणी इतकी लोकप्रिय झाली की लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले. प्रल्हाद शिंदे यांनी गायनाचा धंदा केला नाही म्हणून त्यांना कधीही आर्थिक स्थैर्य मिळाले नाही पण त्यांच्या गाण्यांमुळे कॅसेट कंपन्या मात्र गब्बर झाल्या. २३ जून २००३ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या गाण्याची परंपरा पुढे आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, चंद्रकांत शिंदे या मुलांनी जपली तीच परंपरा त्यांची नातवंडं देखील जपत आहे. आज शिंदे घराणे हे संगीत क्षेत्रातले ब्रँड बनले आहे याचे सर्व श्रेय प्रल्हाद शिंदे यांना जाते. मधुर गळ्याचे अजरामर लोक गायक प्रल्हाद शिंदे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.