विद्यार्थ्‍यांचे शारीरिक व बौद्धिक ‘पोषण’ होणार

    15-Jun-2024
Total Views |
 
- पाककृती समिती अध्‍यक्ष शेफ विष्‍णू मनोहर यांचे मत
 
- ‘पोषण’ आहारात वापरल्‍या जाणार शाळेच्‍या परसबागेतील भाज्‍या
 
students will be physically and intellectually nourished
 (Image Source : Internet/ Representative)
नागपूर :
शाळेतील परसबागेत तयार झालेल्‍या लालभोपळा, दुधीभोपळा, शेवगा इत्‍यादी भाज्‍या आता माध्‍यान्‍ह भोजनाला अधिक पौष्टिक करणार आहेत. यामुळे विद्यार्थ्‍यांचे केवळ शारीरिकच नाही तर शेतीसोबतच भाज्‍या कुठे आणि कशा लागतात इत्‍यादी ज्ञान मिळाल्‍यामुळे बौद्धिक पोषणदेखील होणार आहे.
 
सरकारी शाळांमध्‍ये शैक्षणिक 2024-25 पासून तांदूळ, डाळ, शेंगदाणे आणि भाज्यांसह कडधान्‍ये आणि स्‍वीट डिश असा एकुण 15 पौष्टिक पदार्थांचा समावेश असलेला ‘पोषण आहार’ लागू करण्‍यात आला आहे. त्‍याअनुषंगाने पाककृती सम‍ितीचे अध्‍यक्ष व परसबाग सम‍ितीचे विदर्भ, मराठवाडा व खान्‍देश सम‍ितीचे अध्‍यक्ष प्रसिद्ध शेफ विष्‍णू मनोहर यांनी नव्‍या ‘पोषण आहार’ बद्दल विस्‍तृत माहिती दिली.
 
अशी झाली 15 रेसिपींची निवड
 
माध्‍यान्‍ह भोजनाच्‍या मेन्‍यूमध्‍ये बदल करण्‍याकरीता महाराष्‍ट्र शासनाच्‍या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे मंत्री यांच्‍या मार्गदर्शनात 15 मार्च 2023 रोजी आहारतज्‍ज्ञांचा समावेश असलेली पाककृती समिती गठीत केली. शेफ विष्‍णू मनोहर यांच्‍या अध्‍यक्षतेत स्‍थापन झालेल्‍या या सम‍ितीने माध्‍यान्‍ह आहारासाठी 25 पौष्टिक रेसिपी सुचवल्‍या. बचतगटांच्‍या माध्‍यमातून त्‍या तयार केल्‍या गेल्‍या, त्‍यांची कॅलरीज, फायबर, आयर्न आदी पौष्टिक मूल्‍ये तपासण्‍यात आली व नंतर त्‍यांचे मंत्रालयात प्रदर्शन भरवण्‍यात आले. विविध मान्‍यवरांनी केलेल्‍या परीक्षणानंतर त्‍यातून 15 रेसिपी पोषण आहारासाठी निवडण्‍यात आल्‍या, असे विष्‍णू मनोहर म्‍हणाले.
 
विद्यार्थ्‍यांना मिळणार ‘स्वीट डिश’
 
खिचडी क‍िंवा वरण भात खाऊन कंटाळलेल्‍या शालेय विद्यार्थ्‍यांना आता पुलाव, व्हिजिटेबल पुलाव,चना पुलाव,सोयाबीन पुलाव, मसूरपुलाव, एग पुलाव,मसाले भात, मूग डाळ खिचडी,बिन्‍स खिचडी, मूंग शेवगा डाळ आणि भात, कडधान्‍ये, केळी, अंडी आणि त्‍यासोबत, तांदळाची खीर, मिलेट पुडींग अशा स्वीट डिशदेखील मिळणार आहेत. अतिरिक्‍त तांदूळाची इडलीदेखील तयार करता यावी, या उद्देशाने प्रत्‍येक शाळेला इडली पात्र इ. साहित्‍य देण्‍यात यावे, अशी शिफारस पाककृती समितीने केली असल्‍याचे विष्‍णू मनोहर यांनी सांगितले.
  
विद्यार्थी कुंडीत लावतील भाज्‍या
 
नागरी भागांतील शाळांमध्‍ये परसबाग निर्मितीसाठी 27 फेब्रुवारी 2024 रोजी सम‍िती गठीत करण्‍यात आली होती. या समितीचे मुंबई-पुणे विभागाचे अध्‍यक्ष विठ्ठल कामत हे असून विदर्भ, मराठवाडा, खान्‍देश विभागाचे अध्‍यक्ष विष्‍णू मनोहर हे आहेत. या समितीने शाळांची पाहणी करून परसबाग निर्माण करण्‍यासाठी येणा-या अडचणी व सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर यांना सादर केल्‍या. त्‍यानुसार ज्‍या शाळांमध्‍ये भरपूर जागा आहे तिथे परसबाग तयार करण्‍याचे निर्देश देण्‍यात आले असून इतर शाळांतील विद्यार्थ्‍यांनी पालकांच्‍या मदतीने घरी कुंडीतच शक्‍य त्‍या भाज्‍यांचे उत्‍पादन घ्‍यावे, असे सुचवले आहे. यामुळे विद्यार्थ्‍यांच्‍या ज्ञानातही भर पडेल आणि त्‍यांना आर्थिक लाभही होऊ शकेल.
 
प्रशिक्षण आणि परीक्षणही
 
शाळांमध्‍ये बचत गट किंवा शाळेतील कर्मचारी माध्‍यान्‍ह आहार तयार करतात. त्‍यांना पोषण आहारातील 15 रेसिपीच्‍या पाककृती व्हिडिओद्वारे शिकवण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. त्‍यांच्‍या मानधनादेखील पूर्वीच्‍या तुलनेत वाढ करण्‍यात येणार आहे. याशिवाय, शाळांमध्‍ये तयार होणा-या रेसिपींचे वर्षातून तीनदा समितीद्वारे परीक्षणदेखील केले जाणार आहे. परसबागेचे प्रशिक्षण देण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेतील शेतीविषयक तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. याशिवाय, भाज्‍या व वाया गेलेल्‍या अन्‍नापासून खत तयार करण्‍याचेदेखील प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे विष्‍णू मनोहर म्‍हणाले.