Reasi Terror Attack : दहशतवादी हल्ल्याचा NIA करणार तपास; ड्रोनच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध सुरू

    10-Jun-2024
Total Views |

reasi terror attack nia will investigate the terrorist attack search for terrorists with the help of drones
 (Image Source : Twitter)
 
श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी घात घालून बसलेल्या दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर हल्ला केला. हे सर्व भाविक रियासीच्या शिवखोडी धामचे दर्शन घेऊन परतत होते. याच दरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. या हल्ल्यानंतर बस खोल खड्ड्यात कोसळली. या हल्ल्यात ९ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले असून 33 जण जखमी झाले आहेत. महत्वाचे म्हणजे अमरनाथ यात्रा सुरू होण्याच्या अवघ्या 20 दिवस आधी हा हल्ला झाल्याने दहशतवाद्यांचे हे कोणते षड्यंत्र तर नाही, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्था (NIA) करणार असून एनआयएचे पथक तपासासाठी रियासी जिल्ह्यात दाखल झाले आहे.

 
जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात भाविकांनी भरलेल्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास NIA करणार आहे. राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) पथक पोलिसांना मदत करण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मू विभागातील रियासी जिल्ह्यात पोहोचले आहे. एनआयएची फॉरेन्सिक टीम ग्राउंड लेव्हलवरून पुरावे गोळा करण्यात मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, रियासीमध्ये पोलिस, एसओजी, सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवानांकडून शोधमोहीम राबवली जात आहे. जंगल परिसरात शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.
 
 
रविवारी संध्याकाळी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर रियासीमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला, ज्यामध्ये एका निष्पाप बालकासह नऊ यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. मृत आणि जखमी झालेले सर्व भाविक उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत 6-7 प्रवासी गोळी लागल्याने जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि प्रशासकीय पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना खोल खंदकातून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. बस खड्ड्यात पडल्यानंतर घटनास्थळी अनेकांचे मृतदेह पडले होते. काही मृतदेह झाडांवर अडकलेले दिसले, त्यामुळे बचावकार्य करण्यात अडचणी येत होत्या. अथक परिश्रमानंतर जखमींना बाहेर काढण्यात आले. रियासी येथून पोलिस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. जखमींना पीएचसी पौनी आणि त्रियथ येथे नेण्यात आले. पौनी येथील सर्व जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना जिल्हा रूग्णालय रियासी येथे रेफर करण्यात आले. याशिवाय काही जखमींना आरोग्य केंद्र भरख येथेही आणण्यात आले.
 
रियासी दहशतवादी हल्ल्याबाबत एसएसपी मोहिता शर्मा यांनी सांगितले की, 'काल संध्याकाळी 6 वाजता एक प्रवासी बस शिवखोडी येथून दर्शन घेतल्यानंतर रियासीकडे जात होती. यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून 33 जण जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.'
 
दरम्यान, रियासी दहशतवादी हल्ल्यात वाचलेला एक यात्रेकरूंची सांगितले की, 'माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्यानंतर मी शिव खोरीला गेलो. तिथून परतत असताना 4-5 किमी नंतर आमच्या बसवर गोळ्या झाडल्या गेल्या. गोळीबार थांबला नाही. आमची बस खड्ड्यात पडल्यानंतर ड्रायव्हरला गोळी लागली आणि काही लोक गोळीबारात जखमीही झाले.'
 
 
 
अमरनाथ यात्रेपूर्वी झाला दहशतवादी हल्ला
 
अमरनाथ यात्रा सुरू होण्याच्या अवघ्या 20 दिवस आधी शिवखोडी धामचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर हा दहशतवादी हल्ला झाला. या बसमध्ये एकूण 42 प्रवासी होते. दर्शनानंतर परतत असताना पौनी आणि शिवखोडी दरम्यान कांडा त्रयथ भागातील चंडी मोडजवळ आधीच घातपाती हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी बससमोर येऊन गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस सुमारे 200 फूट खोल खड्ड्यात कोसळली. बस खाली पडल्यावर तिथे उपस्थित असलेल्या इतर दहशतवाद्यांनी मागून गोळीबार केला. हा दहशतवादी हल्ला सामान्य हल्ला नव्हता. अमरनाथ यात्रेपूर्वी ज्याप्रमाणे ही घटना घडली त्यावरून दहशतवाद्यांचा हा कुठला मोठा कट तर नाही, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. इतकेच नाही तर या हल्ल्यानंतर सामान्य जनतेच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणेसमोर भाविकांच्या सुरक्षेचे मोठे आव्हान उभे झाले असून यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, अमरनाथची यात्रा २९ जूनपासून सुरू होणार आहे.