एकपात्री ‘नटसम्राट’ चे उत्‍कृष्‍ट सादरीकरण

    10-Jun-2024
Total Views |
- नाट्य परिषद नागपूर शाखेचा पितृऋण पुरस्कार सोहळा थाटात संपन्‍न
 
Natsamrat
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेतर्फे फादर्स डे चे औचित्य साधून वि. वा. शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ (Natsamrat) या नाटकाच्या एकपात्री प्रयोगाचे उत्‍कृष्‍ट सादरीकरण करण्‍यात आले. सोबतच पितृऋण पुरस्कार सोहळादेखील रविवारी पार पडला.
 
महिला महाविद्यालयातील नवनिर्मित कै. कृष्णराव भागडीकर स्‍मृती सभागृहात झालेल्‍या या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी अ. भा. मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी होते तर स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस, नाट्य परिषद नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील, डॉ. रंजन दारव्हेकर यांच्‍यासह नागपूर शाखेचे उपाध्यक्ष विष्णू मनोहर, प्रमुख कार्यवाह नरेश गडेकर, मध्‍यवर्ती शाखेचे कार्यकारी सदस्य संजय रहाटे यांची उपस्‍थ‍िती होती. यावेळी विनोद कुलकर्णी, राजा करवाडे, रविकिरण देशपांडे, ॲड. पराग लुले आणि प्रदीप धरमठोक या ज्येष्ठ कलावंतांना पितृऋण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
त्‍यानंतर वि.वा. शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट या एकपात्री नाट्यप्रयोगाचे डॉ. दीपलक्ष्‍मी भट यांनी उत्‍कृष्‍ट सादरीकरण आले. या गुणी अभिनेत्रीने नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका या एकपात्री नाटकातून अप्रतिमरित्या सादर केली. मूळ संहितेचे संपादन, दिग्दर्शन व प्रकाशयोजना रमेश लखमापुरे यांची होती. नेपथ्य स्वप्निल बोहटे यांनी व संगीताची जबाबदारी मंथन उकुंडे यांनी सांभाळली. वेशभूषा प्राची व्यवहारे व निर्मिती सहाय्य अपर्णा लखमापुरे व सत्यम निंबोळकर यांचे होते. मानिनी बहुउद्देशीय संस्थेच्‍या या प्रस्‍तुतीचे सर्वांनी कौतुक केले.
 
सुप्रसिद्ध अभिनेते देवेंद्र दोडके यांनी सन्मानपत्राचे वाचन केले तर नरेश गडेकर यांनी प्रास्ताविक व दिपाली घोंगे यांनी सूत्रसंचालन केले. अजय पाटील यांनी आभार मानले.