पोलिस तलाव आणि बिनाकी तलावाच्या कामाची आयुक्तांकडून पाहणी

    10-Jun-2024
Total Views |

inspection of police pond and binaki pond work by commissioner
 
नागपूर :
नागपूर महानगरपालिकेद्वारे पोलिस लाईन टाकळी येथील तलाव आणि बिनाकी मंगळवारी येथील तलावाच्या पुनरुज्जीवनाचे कार्य सुरू असून या कामाची शनिवारी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पाहणी केली. दोन्ही तलावांच्या पुनरुज्जीवनाशी संबंधित कामांना गती देउन पावसाळ्यात कुठलाही त्रास होणार नाही, यादृष्टीने कार्य करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.
 
आयुक्तांच्या पाहणी दौ-यात अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त अशोक घारोटे, झोनचे कार्यकारी अभियंता सुनील उईके, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, कार्यकारी अभियंता अजय गेडाम, सार्वजनिक आरोग्य अभियंता संदीप लोखंडे आदी उपस्थित होते.
 
मनपा आयुक्तांनी सर्वप्रथम पोलिस लाईन टाकळी तलावाच्या कामाची पाहणी केली. तलावाचे पुनरुज्जीवन कार्य तसेच तलावाची संरक्षण भिंत याबाबत माहिती जाणून घेतली. तलावाच्या बाजून वाहणाऱ्या नाल्याची देखील त्यांनी यावेळी पाहणी केली. सद्यस्थितीत तलावाची किनार भिंत तयार करण्यात आली असून तलावाचे खोलीकरण करण्यात येत आहे. याशिवाय मुख्य रस्त्यालगत नाल्याच्या काठावरील पडलेली सुरक्षा भिंतीचे कामही केले जात आहे. तलावाच्या आतील भागातील कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी निर्देशित केले.
 
बिनाकी मंगळवारी येथील तलावाच्या कामाचा देखील मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आढावा घेतला. या तलावाशी संबंधित कामाचे त्यांनी निरीक्षण केले व आवश्यक माहिती जाणून घेतली. पावसाळ्यात कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होउ नये याकरिता आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत त्यांनी निर्देशित केले. यावेळी दोन्ही प्रकल्पाचे सल्लागार सल्लागार निशिकांत भिवगडे यांच्यासह मंगळवारी आणि सतरंजीपुरा झोनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.