‘ह्युमन कॅपिटल’ व्‍यवसायाची ताकद - नरेंद्र कुमार

    10-Jun-2024
Total Views |
 
 
human capital strength of business narendra kumar
 
नागपूर :
कोणताही व्‍यवसाय सुरू करताना जशी भांडवल, जमीन, मशिनरी, पायाभूत सुविधांची गरज असते तशीच कुशल मनुष्‍यबळाची देखील नितांत गरज असते. हे ह्युमन कॅपिटल व्‍यवसायाची खरी ताकद असते. असे वेस्‍टर्न कोलफिल्‍डचे जनरल मॅनेजर नरेंद्र कुमार म्‍हणाले. विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशन (व्‍हीएमए) च्‍यावतीने चिटणवीस सेंटर येथे आयोजित रविवारच्‍या साप्‍ताहिक सत्रात ‘रोल ऑफ एचआर इन एमएसई ॲज ए गेम चेंजर’ विषयावर ते बोलत होते.
 
नरेंद्र कुमार यांनी मध्‍यम आकाराच्‍या व्‍यवसायांमध्‍ये मनुष्‍यबळ व्‍यवस्‍थापनाच्‍या भूमिकेवर सविस्‍तर चर्चा केली ते म्‍हणाले, व्‍यवसायामध्‍ये अकुशल आणि अशिक्षित मनुष्‍यबळ काम करत असेल तर ते त्‍या व्‍यवसायासाठी नुकसानदायी ठरू शकते. अशावेळी व्‍यवसायामध्‍ये एचआर कन्‍सलटंटची भूम‍िका महत्‍वाची ठरते.
 
व्‍यवसायानुरूप मनुष्‍यबळाची योग्‍य निवड, नियुक्‍ती, कौशल्‍य विकास, प्रशिक्षण, त्‍यांच्‍या कामगिरीचे व्यवस्‍थापन, कर्मचाऱ्यांचे प्रतिबद्ध, वेतन व भरपाई, तक्रारींचे निवारण व इतर कायदेविषयक बाबींची जबाबदारी हा मनुष्‍यबळ सल्‍लागार किंवा एचआर विभाग सांभाळत असतो व रणनीती आखत असतो.
 
कोविड काळातील एका मोठ्या हॉटेलचे उदाहरण देताना ते म्‍हणाले, या काळात त्‍या हॉटेल मॅनेजमेंटने त्‍यांच्‍या कर्मचा-यांना नोकरीवरून न काढता त्‍यांना आर्थिक व वैद्यकीय मदतदेखील केली होती. व्‍यवसायाचा शाश्‍वत विकास साधायचा असेल तर मानवी मूल्‍ये, नीतीमूल्‍ये जोपासली गेली पाहिजेत, कर्मचाऱ्यांना उत्‍तम सुविधा उपलब्‍ध करून देणे, वेळोवेळी त्‍यांच्‍या तक्रारींचे निवारण करणे, वेळोवेळी प्रोत्‍साहन देणे याकडे लक्ष दिल्‍यास कुशल कर्मचारी नोकरी सोडून जाणार नाहीत. काही कारणास्‍तव ते सोडून गेले तर तुमचे ‘ब्रँड ॲम्‍बेसेडर’ म्‍हणून काम करतील, असा विश्‍वास नरेंद्र कुमार यांनी व्‍यक्‍त केला. वर्कस्‍पेस पॉलिसी, ट्रेनिंग इम्‍पॅक्‍ट असेसमेंट, परफार्मन्‍स मॅनेजमेंट, टॅलेंट इन्‍व्‍हेंटरी अशा अनेक बाबींवर त्‍यांनी यावेळी प्रकाश टाकला. शेवटी त्‍यांनी उपस्‍थ‍ितांच्‍या शंकांचे निरसन केले. या सत्राचे मॉडरेटर हरिश पात्रीकर होते तर हेमंत झुंजुरकर सेशन इन्‍चार्ज होते.