- राज्यात महायुतीला कमीत कमी 60% जागा
- चंद्रपूर व अमरावती महायुतीला धोका बसण्याची शक्यता
(Image Source : Internet)
नागपूर :
केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. सत्तेत पुन्हा मोदीच येणार असल्याचा दावा रामटेकचे माजी खासदार, माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री सुबोध मोहिते पाटील यांनी केला. अनौपचारिक चर्चा करताना ते पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीचा संपूर्ण टप्पा आटोपला आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात महायुतीला ६० टक्के तर महाविकास आघाडीला ४० टक्के असे अनुपात राहण्याची शक्यता असली तरी महायुतीची टक्केवारी वाढू शकते. साधारणतः महायुतीला ३० ते ३२ जागा मिळण्याची शक्यता आहे. १६ ते १८ जागा ह्या महाविकास आघाडीला मिळेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. विदर्भाच्या बाबतीत अनुमान व्यक्त करतांना माजी खासदार मोहिते म्हणाले की विदर्भातील दहा लोकसभा जागांपैकी आठ जागा महायुतीला व दोन जागा महाविकास आघाडीला मिळेल त्यापैकी एक जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला व एक जागा काँग्रेस पक्षाला मिळण्याची शक्यता वर्तवली. अमरावती व चंद्रपूर या दोन जागेवर महायुतीला धक्का बसू शकतो असे भाकित त्यांनी व्यक्त केले.
शिवसेना मध्ये उभी फूट पडली असली तरी बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच असल्याने आजही गाव खेड्यात व तळागाळातील शिवसैनिकांना वाटत असल्याने त्यांच्या बाजूने सहानुभूती लाट ही उबाठाची जमेची बाजू असल्याचे ते म्हणाले. या निवडणुकीमध्ये भाजपच्या नंतर मोठा पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच राहण्याची शक्यता वाटत असल्याचे मोहिते पाटील बोलले.
काटोल विधानसभाकरिता मोर्चे बांधणी
सुबोध मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विदर्भातील मोठे नेते असून त्यांनी विधानसभेकरीता काटोल मतदार संघावर लक्ष केंद्रित केले असून मोर्चे बांधणी सुरू असल्याचे बोलल्या जात आहे. काटोल विधानसभेवर शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख विद्यमान आमदार आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाण्याची शक्यता असल्याने सुबोध मोहिते पाटील यांची मोर्चे बांधणी सुरू असल्याची चर्चा आहे.