अमरावती :
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी नागरी समारंभात शंकरबाबा पापळकर यांना सामाजिक कार्याकरिता पद्मश्री पुरस्कार देवून सन्मानित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शंकरबाबांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला. देशाच्या राजधानीत राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला.
अमरावतीमधील अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथे आपल्या आश्रमाच्या माध्यमातून शंकरबाबा पापळकर विकलांग, दिव्यांग, मतिमंद मुलांचे संगोपन करतात. देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक, पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखांमध्ये आणि क्रियाकलापांच्या क्षेत्रात हे पुरस्कार दिले जातात. अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी 'पद्मविभूषण', उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी 'पद्मभूषण' आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी 'पद्मश्री' पुरस्कार दिला जातो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरस्कारांची घोषणा केली जाते. यावेळी मानसपुत्र योगेश आणि मानसकन्या गांधारी यावेळी उपस्थित होते. या सत्कार सोहळ्याकरिता दिल्लीतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आनंद पाटील, राजीव मित्तल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.