मारेकऱ्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी

    09-Apr-2024
Total Views |
- अंमली पदार्थांच्या विक्रीत सक्रीय असल्याचा संशय

5 days police custody for killers
 
नागपूर:
हुडकेश्वरच्या महालक्ष्मीनगरातील रणजीत बाबुराव राठोड (28)च्या खुनात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे तर, एका संशयिताची चौकशी सुरू आहे. अद्याप त्याला अटक झालेली नाही. आकाश दिनेश राऊत (25) रा. हसनबाग, जयश्री दीपक पानझाडे (24) आणि सविना सायरे (24) दोन्ही रा. वाडी, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपी अंमली पदार्थांच्या विक्रीत सक्रीय असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र हुडकेश्वर पोलिस याबाबत काहीही सांगण्यास तयार नाहीत. दरम्यान पोलिसांनी अटकेतील आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. सांगण्यात येते की, आकाश आणि त्याचा भाऊ मायकल वाठोडा परिसरात जुगार अड्डा चालवतात. जवळपास 3 महिन्यांपूर्वी जुगार अड्ड्यावरून झालेल्या वादात सरफराज नावाच्या गुंडाने मायकलवर जीवघेणा हल्ला केला होता.
  
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री रणजीत बाकडे सभागृहासमोर पानठेल्यावर उभा होता. या दरम्यान जयश्री आणि सविना तेथे आल्या. दोघींनीही पानठेल्यावरून सिगारेट खरेदी केली आणि ऐठीत धूर सोडत उभ्या झाल्या. रणजितला हा प्रकार नवखा वाटला. तो आश्चर्याने त्यांच्याकडे पाहात होता. त्याने नजरच त्यांच्यावर रोखली होती. त्याच्या अशा पाहण्यामुळे दोघींनीही त्याला फटकारले. यावरून तरुणींसोबत त्याचा वाद झाला. जयश्रीने फोन करून आकाशला मदतीसाठी बोलावले. आकाश एका साथीदारासह तेथे आला. सर्वांनी मिळून रणजीतला जबर मारहाण केली. दरम्यान आकाशने चाकू काढून रणजीतवर सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. जयश्रीनेही रणजीतवर चाकूने वार केला होता, अशी माहिती मिळाली आहे. तेथून फरार झाल्यानंतर आरोपी वाडी येथील एका खोलीवर गेले. रात्रभर तेथे आराम केल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांशी संपर्क करून आत्मसमर्पण केले. या संपूर्ण प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांच्या तपासावरही संशय निर्माण होत आहे. ज्यावेळी जयश्रीने कॉल केला होता आकाश जुगार अड्ड्यावर बसलेला होता. सांगण्यात येते की, आरोपी अंमली पदार्थांच्या विक्रीसाठीच परिसरात आले होते.