महिलांना लुबाडणारी दिल्लीची टोळी गजाआड

    08-Apr-2024
Total Views |
- 5 गुन्ह्यांचा खुलासा, शोधण्यासाठी राबविली विशेष मोहीम

gang of delhi robbing women busted
(Image Source : Internet/ Representative) 
 
नागपूर: 
शहरभरात फिरून महिलांना लुबाडत दागिने पळविणाऱ्या दिल्लीच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने संयुक्त मोहीम राबवून अटक केली. रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींकडून 5 गुन्ह्यांचा खुलासा झाला आहे. हरीश बाबुलाल डाबी (27), अरुण अर्जुन परमार (19), पारोत जीतू परमार (20), रथनी सीताराम सोळंकी (40), पूजा नरेश सोळंकी (22) आणि गोपी जीवा सोळंकी (50) सर्व रा. दिल्ली, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांचे तीन साथीदार रजनी गोपू सोळंकी (30), रुही सीताराम सोळंकी (20) आणि अजय सीताराम सोळंकी (20) हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
  
आठवडी बाजारात महिलांना लक्ष्य
 
या टोळीने गत चार दिवसांपासून शहरात धुमाकुळ घातला होता. अजनीच्या रामटेकेनगर टोलीत आरोपींनी एक खोली भाड्याने घेतली होती. शहरभरातील आठवडी बाजारांत जाऊन त्या एकट्या महिलांना हेरत होते. या टोळीतील एक महिला पागल असल्याचा बनाव करीत होती. इतर आरोपी तिच्या बॅगमध्ये मोठी रक्कम असल्याची बतावणी करून महिलांना ती अर्धी-अर्धी वाटून घेण्यास सांगत होते. नोटांच्या बंडलमध्ये वरची नोट खरी रहात होती, तर इतर नोटा बनावट असायच्या. एकामागेएक घटनांनी पोलिसांच्या नाकी नऊ आणले होते.
 
सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा सुगावा
 
 युनिट 5चे पथक कोराडी ठाण्यात नोंद प्रकरणाचा तपास करीत होते. सखोल तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपी महिला आणि संशयित तरुणाचा सुगावा लागला. पोलिस त्यांना पकडण्यासाठी रामटेकेनगर टोलीत पोहोचले, मात्र आरोपींना आधीच माहिती मिळाली होती. सर्वांनी वेगवेगळ्या गल्ल्यांमधून पळ काढला. फुटेजमध्ये कैद हरीश आणि अर्जुनला पोलिसांनी ओळखले. दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तृतीयपंथी रुहीशी संपर्क करून घेण्यात आला. तिने इतवारी रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती दिली.
 
5 तोळे सोन्यासह 3.67 लाखांचा माल जप्त
 
तत्काळ युनिट 3 चे पथक आणि शांतीनगर पोलिसांना सूचना देण्यात आली. फलाटावर उभ्या रेल्वेगाडीची झडती घेण्यात आली, मात्र कोणीही मिळाले नाही. तोपर्यंत सायबर पोलिसांनी आरोपींचे लोकेशन शोधून काढत ते मुख्य रेल्वे स्थानकावर असल्याचे सांगितले. सीताबर्डी पेालिसांना माहिती देण्यात आली. मुख्य रेल्वे स्थानकावर संयुक्त पथकांनी शोध मोहीम राबवून इतर चार आरोपींना अटक केली. चौकशीत आरोपींनी पाचपावली, कोराडी, जुनी कामठी, धंतोली आणि नंदनवन ठाण्यांतर्गत गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 5.1 तोळे सोने, 2 मोबाईल आणि रोख 23 हजार रुपयांसह 3.67 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. उर्वरित माल फरार आरोपी रुही, रजनी आणि अजयकडे आहे.
माल हाती येताच पुरुष साथीदारांकडे सोपवितात
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळीतील महिला लोकांना जाळ्यात अडकवतात तर पुरुष पाळत ठेवतात. माल हाती येताच पुरुषांकडे सोपविण्यात येतो, जेणे करून पकडले तरी त्यांच्याजवळ काहीही सापडत नाही. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त निमित गोयल, सीताबर्डीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संतोष कदम, विनोद तिवारी आणि सीताबर्डीचे पथक तसेच युनीट पाचचे पोलिस निरीक्षक राहूल शिरे, राहुल मोटे, आशिषसिंग ठाकूरसह पथकाने कारवाई केली.