अमरावती:
बडनेरा रेल्वे स्थानक परिसरातील वर्कशॉपला रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत तेथील साहित्य जळून खाक झाले असले, तरी रेल्वे स्थानकावरील गृहरक्षक (होमगार्ड) दलातील जवान व महिला पोलीस कर्मचा:यांच्या सतर्कतेमुळे ही आग आटोक्यात आली.
रेल्वे स्थानकाच्या जुन्या तिकीटघराच्या परिसरात रेल्वे पोलीस (जीआरपी) चे पोलीस ठाणे आहे. त्या पोलीस ठाण्याच्याच बाजुला असलेल्या वर्कशॉपला ही आग लागली. या आगीत वर्कशॉप मधील काही साहित्य जळाले. आग लागल्याचे दिसताच गृहरक्षक दलातील जवान योगेश कथलकर व डायरी अमलदार दुर्गा रामटेके यांनी धाव घेऊन पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचारी जयकुमार तायडे, सफाई कामगार गंगादधर देव्हारे यांनीही आग विझविण्यासाठी मदत केली; मात्र तरी आगीचा भडका उडाला. त्यादरम्यान महापालिकेच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले.
अग्निशमनच्या पथकाने तातडीने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. आग लागण्याचे नेमके कारण कळू शकले नसले, तरी कुणीतरी अर्धवट पेटलेली सिगारेट फेकल्याने तिथे आग लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन पथकात फायरमॅन शरद भांदर्गे, संतोष केंद्रे, मोहन महल्ले व वाहनचालक नजीर यांचा समावेश होता.