भारतीय मूल्य ही जनसंपर्कासाठी पोषक - डॉ. वेदप्रकाश मिश्रा

    23-Apr-2024
Total Views |
- राष्ट्रीय जनसंपर्क दिनाचे आयोजन
- उत्कृष्ट जनसंपर्काबद्दल डॉ. मोइज हक, शशीन रॉय यांचा गौरव

Organization of National Public Relations Day

 
नागपूर :
स्वातंत्र्यासाठी जनमत तयार करण्यात जनसंपर्क क्षेत्राने मोलाची भूमिका बजावली आहे. याचा आधार असणारी वैविद्यपूर्ण भारतीय मूल्य ही जनसंर्पकाच्या विकासाकरिता पोषक ठरल्याचे, प्रतिपादन कराड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.
 
पब्लिक रिलेशन सोसायटी (पीआरएसआय) नागपूर व माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविभवन येथील सभागृहात 21 एप्रिल रोजी राष्ट्रीय जनसंपर्क दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. मिश्रा बोलत होते.
 
राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. मोईज मन्नान हक व पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक शशीन रॉय यांचा स्मृतिचिन्ह व तुळशीचे रोपटे देऊन विशेष गौरव करण्यात आला.
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीआरएसआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.पी.सिंग होते. यावेळी नागपूर शाखेचे उपाध्यक्ष अखिलेश हळवे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, सचिव मनिष सोनी, माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर आदी उपस्थित होते.
 
'सनातन व्हॅल्यु ॲण्ड इमर्जिन इंडिया, रोल ऑफ पब्लिक रिलेशन’ या विषयावर डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी सनातन हा भूतकाळ नसून वर्तमान आहे. पूर्वीपासूनच हे दिशादर्शक आहे. तसेच भारतीय मूल्य ही संस्कृतीसाठी मैलाचा दगड ठरली असून पुढच्या प्रवासासाठी दिशादर्शकाची भूमिका वठवित आहे. वर्तमान स्थितीत प्रामाणिकताच विकासात्मकतेला प्रेरक ठरते. त्यामुळे नुतनता स्विकारण्याची जबाबदारी जनसंपर्काची असल्याचे त्यांनी सांगितले. महाभारत काळातील विविध उदाहरणांद्वारे त्यांनी जनसंपर्काची व्याप्ती विशद केली.
 
अध्यक्षीय भाषणात एस.पी. सिंग यांनी सर्व सामुदायामध्ये बंधुभाव व एकात्मता निर्माण करण्याची जबाबदारी जनसंवादाची आहे, ती पूर्ण करण्यासाठी ही संस्था कायमच पुढाकार घेत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी मार्गदर्शन केले.
 
राष्ट्रीय जनसंपर्क दिनाच्या आयोजनासोबतच नागपूर चाप्टरतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिष सोनी यांनी तर आभार अखिलेश हळवे यांनी मानले.
 
यावेळी मध्यप्रदेश पर्यटन विकास बोर्डाचे निवृत्त उपसंचालक युवराज पडोळे, एलआयटीचे प्रमुख सल्लागार मोहन पांडे, वेकोलीचे महाव्यवस्थापक जनसंपर्क पी. नरेंद्रकुमार, अशोक कोल्हटकर यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास शासकीय, निमशासकीय तसेच विविध क्षेत्रातील जनसंपर्क अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.