RTMNU: कीर्ती उपक्रमातंर्गत निवड चाचणी २३ पासून

    22-Apr-2024
Total Views |
- अ‍ॅथलेटिक्स, कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल, फुटबॉल खेळांचा समावेश
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे आयोजन
 
RTMNU Selection Test under Kirti Initiative from 23rd

 
नागपूर :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने कीर्ती प्रोजेक्ट अंतर्गत क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंत खेळाडूंची निवड प्रक्रियेच्या चाचणीचे आयोजन २३ एप्रिल पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रवीनगरातील क्रीडांगणावर करण्यात आले आहे. विद्यापीठाचे खेलो इंडिया केंद्राच्या माध्यमातून या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद सुर्यवंशी यांनी दिली.
 
क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे आणि नागरिकांमध्ये खेळाचे ज्ञान निर्माण करणे हे भारताचे उद्दिष्ट आहे. खेळांना राष्ट्रीय विकास, आर्थिक विकास, वैयक्तिक विकासाचे साधन म्हणून मुख्य प्रवाहात आणणे हे अंतिम उद्दिष्ट आहे. खेलो इंडिया व्हिजनला पुढे नेण्यासाठी टॅलेंट अँटिफिकेशन आणि डेव्हलपमेंटचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. या अंतर्गत आधुनिक काळातील तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय बेंच मार्क वापरून क्रीडा प्रतिभा ओळखणे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणे हा उद्देश कीर्तीचा आहे. या उपक्रमांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ५ सेंटरची मान्यता मिळाली आहे. कोणत्याही जिल्ह्यातील ९ ते १८ वयोगटातील मुले व मुली या निवड चाचणीत सहभागी होऊ शकतात. निवड चाचणीकरिता सकाळी ५.३० वाजता खेळाडूंना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ क्रीडा परिसर, रवी नगर, अमरावती रोड येथे रिपोर्ट करायचा आहे. सोबतच आपल्याला लागणारे पुरेसे पाणी व खाद्यपदार्थांची सुविधाही खेळाडूंनी करायची आहे.
 
पाचही खेळाच्या शारीरिक क्षमता व कौशल्य चाचणी
निवड चाचणीला अ‍ॅथलेटिक्स खेळापासून २३ एप्रिलला सुरुवात होणार आहे. यात कबड्डी २४, खोखो २५, व्हॉलीबॉल २६ आणि फुटबॉलची निवड चाचणी २७ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. या पाचही खेळाच्या शारीरिक क्षमता तसेच स्किल टेस्ट होणार आहेत. नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे माजी संचालक डॉ. धनंजय वेलूरकर यांच्या मार्गदर्शनात आयोजन समिती गठीत करण्यात आली. डॉ. आदित्य सोनी, डॉ. संजय चौधरी, डॉ. मनोज आंबडकर, डॉ. विवेकानंद सिंग, डॉ. नितीन जंगिटवार, डॉ. अमित टेभूर्णे, डॉ. सुधीर सहारे, सायली वाघमारे, अर्चना कोट्टेवार, रामचंद्र वाणी, नितीन धाबेकर यांचा समावेश या समितीत असल्याची माहिती विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी दिली.