फ्लोरिडात शाळकरी मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी

    02-Apr-2024
Total Views |

florida bans social media use by school children
(Image Source : Internet/ Representative)
 
सोशल मीडिया हा आज परवलीचा शब्द झाला आहे. आजचे युगच सोशल मीडियाचे युग आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण आज सोशल मीडिया ही जीवनावश्यक गरज बनली आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच जण सोशल मीडियावर सक्रिय आहेत. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे आणि या स्मार्ट फोन मध्ये व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, शेअर चाट, स्नॅप चाट, यु ट्यूब अशा अनेक सोशल मीडियावर साईट आहेत. या सोशल मीडिया साईटवर सतत सक्रिय राहून आपण किती सोशल आहोत हे दाखवण्यासाठी जो तो धडपडत असतो. विशेषतः किशोवयीन आणि तरुण मुलांमध्ये या सोशल मीडिया साईटची भलतीच भुरळ आहे.
  
आजची युवा पिढी आपला सर्वाधिक वेळ सोशल मीडियावरच व्यतीत करते. एका सर्व्हेक्षणानुसार आपल्या देशातील मुले दररोज सरासरी पाच तास सोशल मीडियावर व्यतीत करतात. याचाच अर्थ आपली मुले सोशल मीडियाच्या आहारी गेली आहेत. ही मुले दिवसभर उपाशी राहू शकतील पण सोशल मीडिया पासून दूर राहू शकणार नाही. विशेष म्हणजे केवळ तरुण मुलेच नाही तर शाळकरी मुले देखील सोशल मीडियाच्या आहारी गेली आहेत. तंत्रज्ञानाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. तज्ज्ञांनी अनेकवेळा इशारा देऊनही त्याचा वापर कमी झालेला नाही उलट वाढतच चालला आहे. सोशल मीडियामुळे तर त्याच्या वापर उच्चांकी पातळीवर पोहचला आहे. त्याचे दुष्परिणामही समोर येत आहेत.
  
सोशल मीडियाचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. सोशल मीडियामुळे मुले हिंसक बनू लागले आहेत. सोशल मीडियामुळे मुलांमधील तणाव वाढला आहे. मुलांना डोळ्यांच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत अनेक मुलांना लहान वयातच चष्मा लागल आहे. सोशल मीडियामुळे मुले मैदानी खेळ विसरले आहेत. सोशल मीडियामुळे मुलांमधील संवाद हरपला आहे. मुले एकलकोंडी बनली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सोशल मीडियामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ लागला आहे. मुलांची एकाग्रता भंग झाली आहे. मुले चीडचीडी बनली आहेत म्हणून किमान शाळकरी मुलांना तरी सोशल मीडिया पासून दूर ठेवावे असे तज्ज्ञ सांगत आहेत त्यामुळे अनेक शाळांनी मुलांना शाळेत मोबाईल वापरण्यास बंदी घातली आहे मात्र शाळा सुटल्यावर मुले सोशल मीडियाचा वापर करतातच म्हणून मुलांच्या सोशल मीडिया वापरावर कायद्यानेच बंदी आणावी अशी मागणी होऊ लागली आहे.
  
भारतात अजून तरी शाळकरी मुलांच्या सोशल मीडिया वापरावर अद्याप बंदी आली नसली तरी अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांताने शाळकरी मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे. त्यांनी तसा कायदाच केला आहे. फ्लोरिडा प्रांताचे गव्हर्नर रॉन डी सेंटीस यांनी तसा कायदाच मंजूर करून घेतला आहे. या कायद्यानुसार जानेवारी २०२५ पासून फ्लोरिडा राज्यातील १४ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरता येणार नाही. १४ वर्षाच्या खालील मुलांची सोशल मीडिया खाती डिलीट करण्याचे आदेशही फ्लोरिडा सरकारने कंपन्यांना दिले आहेत. जर कंपन्यांनी सरकारच्या या आदेशाचे उल्लंघन केले तर कंपन्यांना ५० हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
  
फ्लोरिडा सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील अनेक नामवंतांनी फ्लोरिडा सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. भारतातही अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून भारतातही असा कायदा करावा अशी मागणी होऊ लागली आहे. अर्थात कायद्यानेच मुलांचे सोशल मिडियाचे व्यसन सुटेल असे नाही तर कायद्याला प्रबोधनाचीही जोड द्यावी लागेल. कायद्यासोबत मुलांचे प्रबोधन केले, मुलांना सोशल मिडियाचे दुष्परिणाम समजावून सांगितले त्यासाठी शाळेत चर्चा सत्र आयोजित केली तर मुलांचे सोशल मिडियाचे व्यसन सुटण्यास नक्कीच मदत होईल. कायद्याने असोत की प्रबोधनाने मुलांचे मुलांचे सोशल मिडियाचे व्यसन सुटणे महत्वाचे आहे.
  
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.