गुणांची पूजा करणारा भारतीय समाज - प्रवीण योगी

    17-Apr-2024
Total Views |
- रामस्मरण व्याख्यानमालेचा थाटात समारोप
 
Grand conclusion of Ramsmaran lecture series
 
 
नागपूर :
श्रीराम, श्रीकृष्‍ण, श्रीशंकर हे गुण असून या गुणांची पूजा करणारा आपला भारतीय समाज आहे. त्‍यामुळेच इतक्‍या विविध प्रकारच्‍या मूर्ती आपण घडवल्‍या आणि त्‍यात आपल्‍या भावनांचे अनेक रंग भरले, असे मत भारतीय विद्या, मंदिरे व किल्‍ल्‍यांचे अभ्‍यासक प्रवीण योगी यांनी व्‍यक्‍त केले.
 
रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात केशवनगर सांस्कृतिक सभा आणि कलासंगम, कला व सांस्कृतिक मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुनील देवउपाध्ये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू असलेल्या तीन दिवसीय रामस्मरण व्याख्यानमालेचे मंगळवारी समारोप झाला. भारतीय विद्या व किल्‍ले अभ्‍यासक प्रवीण योगी यांचे ‘बिंबब्रह्म आणि वास्तुब्रह्म’ या विषयावर समारोपीय व्याख्यान भाष्‍य केले. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जायका मोटर्सचे कुमार काळे होते तर केशवनगर सांस्‍कृतिक सभेचे किशोर धाराशिवकर व मुकुल मुळे तसेच, कलासंगम सांस्‍कृतिक मंडळाचे रवी ढोके व जयंत खळतकर यांची मंचावर प्रमुख उपस्‍थ‍िती होती.
 
वेद, उपनिषदे त्‍यानंतर वेदांतसूत्र, भगवद्गीतेपर्यंतचा आपला ज्ञानाचा प्रवास आहे. ग्रंथ, भाषा, मंदिरे ही आपल्‍या अस्तित्‍वाची वैशिष्‍ट्ये आहेत, असे सांगताना प्रवीण योगी यांनी अयोध्‍येतील श्रीराममंदिरासह मार्कंडा मंदिर, वेरुळ, अजिंठा, निंलंगा, मेहकर इत्‍यादी ठिकाणच्‍या देव-देवतांच्‍या शिल्‍पांची वैशिष्‍ट्ये सांग‍ितली.
 
मनुष्‍य आनंदाची अनुभूती ही वस्‍तू, पद किंवा प्रतिष्‍ठेने मिळत नाही. खरा आनंद हा स्‍वत:ला ओळखण्‍यात असतो. आपल्‍या अंत:करणात असलेल्‍या श्रीरामाची ज्‍याला जाणीव होते त्‍याला स्‍व मधील परब्रह्माची जाणीव होते व जीवन सफल होते, असे मत कुमार काळे यांनी व्‍यक्‍त केले.
 
सरस्‍वती शिशू मंदिर, नंदनवनच्‍या शिक्षिका अनघा घाटे यांच्‍या मार्गदर्शनात शाळेच्‍या पहिली ते चौथीच्‍या विद्यार्थ्‍यांनी ‘तुझविण रामा मज कंठवेना’ हे रामगीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.
केशवनगर प्रभात शाखेचे सुनील सांगोळे, अंकुर‍ सिड्स, नागपूर नागरिक सहकारी बँक, वाघमारे मसाले, हेडगेवार स्‍मारक सम‍ितीचे व्‍याख्‍यानमालेच्‍या यशस्‍वीतेसाठी सहकार्य लाभले.