...तर तू सुपरस्टार ॲक्टर सुद्धा होशील!; नेहा कक्कडने केले सुपरस्टार सिंगर 3 मध्ये स्पर्धक दिया हेगडेचे कौतुक

    12-Apr-2024
Total Views |

Neha Kakkar praises Superstar Singer 3 contestant Dia Hegde

 
मुंबई :
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपरस्टार सिंगर 3 या लहान मुलांच्या गायन रियालिटी शोमध्ये या रविवारी ‘कल्याण- आनंद नाइट’ सह प्रेक्षकांना एका सुरेल सिने-युगाची सफर देखील घडणार आहे. या महान संगीतकार जोडीला मानवंदना देताना आपले छोटे उस्ताद कल्याण-आनंद यांनी संगीतबद्ध केलेली काही गाजलेली गाणी सादर करून मंचावर सुरांची जादू पसरवणार आहेत. या विशेष भागात खुद्द आनंद वीर शाह आणि त्यांची पत्नी शांता बेन शाह उपस्थित असतील.
 
अनेक सुंदर परफॉर्मन्सेसमध्ये सागर, कर्नाटकातून आलेल्या 11-वर्षीय दिया हेगडेने कॅप्टन सायली कांबळे सोबत सादर केलेले ‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपटातील ‘सलाम-ए-इश्क मेरी जां’ गाणे भाव खाऊन गेले. दिया केवळ आपल्या उत्तम गाण्यासाठी नाही, तर उत्कृष्ट अभिनय कलेसाठी देखील ओळखली जाते. या भागात तिने सुपर जज नेहा कक्कड आणि कॅप्टन सायली कांबळेची नक्कल करून सगळ्यांचे मनोरंजन केले. गायन, अभिनय आणि नृत्य अशा विविध कलांमधील दियाचे कौशल्य पाहून सुपर जज नेहा कक्कडने तिच्या अष्टपैलू प्रतिभेचे आणि गोड व्यक्तिमत्वाचे कौतुक केले. दियाचा हा परफॉर्मन्स तुम्हाला रविवारी बघायला मिळणार आहे.
 
हा परफॉर्मन्स पाहून प्रभावित झालेले आनंद म्हणाले, “या मुलांचे गायन कौशल्य पाहून मी स्तिमित झालो आहे आणि मला ठामपणे असे वाटते आहे की, ते आपल्या देशाचे भावी आवाज आहेत. अप्रतिम प्रशिक्षण दिल्याबद्दल सायलीचे विशेष अभिनंदन. हे पाहून मला 1950 च्या दशकातील स्पर्धात्मक वातावरण आठवले. त्यावेळी मुलांना तत्कालीन प्रसिद्ध गायकांच्या पार्श्वगायन सत्रांची नक्कल करायला सांगण्यात येई आणि मुले ते काम उत्तम करत असत. या लहान मुलांमध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे. आणि सुपरस्टार सिंगरमध्ये मिळणाऱ्या प्रशिक्षणातून त्यांची संगीताची समज वाढते आहे. आपल्या घरीच त्यांचे संगोपन, प्रशिक्षण होत आहे, असे मला वाटते आहे. आपल्यातील प्रतिभेचा शोध घेण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करणाऱ्या पालकांचे देखील मी कौतुक करतो. मुलांनो, असेच छान छान गात रहा. तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत.”
 
हा परफॉर्मन्स पाहून अवाक झालेली सुपर जज नेहा कक्कड म्हणाली, “हा परफॉर्मन्स फारच प्रसन्न आणि मनाला आल्हाद देणारा होता. इतका की, माझ्या चेहऱ्यावरचे हसू मुळी मावळलेच नाही. सायली एक परफेक्ट परफॉर्मर आहे, पण दिया, तुला सलाम! तू आपल्या कॅप्टनच्या अचूकतेची बरोबरी केलीस. खूप अवघड शब्द देखील दियाने अगदी लीलया गायले, ते पाहून मी थक्क झाले. जबरदस्त! हा एक उत्तम प्रयत्न होता. आणि दिया, तू केवळ सुपरस्टार गायक नाही तर सुपरस्टार ॲक्टर सुद्धा बनशील.”