भंडारा जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 192 कोटींचे करार

    03-Mar-2024
Total Views |

- 514 जणांना रोजगाराची संधी, उद्योग वाढीसाठी चर्चासत्र संपन्न

192 crore contract in Bhandara District Level Investment Council

 
नागपूर :
जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे पहिली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद झाली. खासदार सुनिल मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या परिषदेत 11 उद्योग घटकांसाठी 192.91 कोटींचे सामंजस्य करार झाले. यातून 514 जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे उद्योग विभागाने सांगितले.
 
भंडारा येथील हॉटेल व्ही.के या ठिकाणी झालेल्या या परिषदेचे उदघाटन शनिवारी खासदार सुनिल मेंढे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, एमएसएमई विभागाचे सहायक संचालक बघेल व मेटल असोसीएशनचे अध्यक्ष पंकज सारडा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
 
नव उद्योजकांना आकर्षित करणे, जिल्ह्यातील गुंतवणूकदार, व्यावसायिकांना एकत्र आणून भंडारा हा विकासासाठी केंद्रबिंदू मानून जिल्ह्यासह राज्याच्या विकासाला चालना देणे हा जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचा उद्देश असल्याचे बदर यांनी यावेळी सांगितले.
 
जिल्ह्यात उद्योगस्नेही धोरण राबविण्यात येत असून तरुण उद्योजकांनी कठोर मेहनतीची तयारी ठेवावी असे आवाहन खासदार मेंढे यांनी केले.तर जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी या परिषदेतून उद्योग व्यवसाय वाढीसाठी चर्चा-मंथन होऊन त्यातून ठोस मुद्दे पुढे यावेत. त्याबाबत प्रशासन सकारात्मक भुमिका घेईल, असे आश्वस्त केले.
 
जिल्हा विकास आराखडयाबाबत निलेश सांळुके यांनी यावेळी सादरीकरण केले. त्यानंतर जिल्ह्यातील गुंतवणुकीच्या संधीवर त्यांनी विस्तृत प्रकाश टाकला. त्यानंतर जिल्ह्यातील विविध उदयोगाबाबत सामंजस्य करार उदयोग कंपन्याशी करण्यात आले. त्यामध्ये आसगाव ॲग्रो प्रोसेसर्स यांच्याशी 100 कोटीचा सामंजस्य करार करण्यात आला .तर लक्ष इन्होवेशन यांच्या शी 23 कोटी 6 लक्ष रूपयांचा करार करण्यात आला.

यामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन, औद्योगिक सुविधा, व्यवसाय सुलभीकरण व उद्योगांसाठी आवश्यक परवानग्या/मंजुरी आणि सेवा कालमर्यादेत देण्याच्या दृष्टिने कायद्याद्वारे गुंतवणूकदार सुविधा केंद्र/ गुंतवणूक प्रोत्साहन एजन्सी म्हणून एक खिडकी प्रणालीला अधिकार देण्यासाठी उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र (मैत्री) कायदयाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर पर्यटन,वन पर्यटनातील गुंतवणूक व उद्योगाच्या संधीविषयी चर्चासत्रात उपवनसंरक्षक पवन जेफ यांनी विस्तृत सादरीकरण केले. त्यानंतर कृषी क्षेत्रातील संधीविषयी पवन कटनकर,आत्मा संचालक वर्षा चिखले यांनी सहभाग घेतला. तर पितळ व अन्य धातु विषयीच्या बाजारपेठेतील संधीवर मेटल असोसिएशन भंडाराचे अध्यक्ष पंकज सारडा, सचिन झंवर, नरेश मल्होत्रा यांनी जिल्हयातील संधीचे व मार्केंटीगबाबत चित्र मांडले.
 
भेाजन अवकाशानंतर जिल्हयातील निर्यात विषयक संधी तसेच सिडबी संस्थेमार्फत छोटया उदयोगांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सूक्ष्म, लघु व मोठया उदयोगांच्या विविध योजनांबाबत जिल्हा उदयोग केंद्राद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. या उदयोग परिषदेत बचतगटांचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच एमसीईडीव्दारा प्रशिक्षीत महीलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
 
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक हेमंत बदर, भागवत गाडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकुमार बोरकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे फेलो निलेश साळुंके, बँकेचे अधिकारी उपस्थित होते.