आला उन्हाळा आरोग्य सांभाळा...!

    27-Mar-2024
Total Views |
 
take care of your health in the summer
(image source: internet/representative)  
 
 
राज्यात सूर्यनारायणाने आपला प्रकोप दाखवायला सुरुवात केली आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासून राज्यातील तापमान वाढायला सुरुवात झाली होती. सर्वत्र उकाडा जाणवत होता. आता मार्च महिन्याच्या अखेरीस तर राज्यातील अनेक शहरांचे तापमान उच्चांकी पातळीवर पोहचले आहे. राज्यातील अनेक शहरांचे तापमान ४० अंशाच्या घरात पोहचले आहे. काही शहरांनी तर ४० अंशाचा आकडा देखील पार केला आहे. विदर्भ मराठवाड्यात तर तापमानाने आजच उच्चांक गाठला आहे. पुढील दोन आठवड्यात राज्यातील सर्वच शहरांचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या घरात पोहचेल आणि राज्यात प्रचंड उकाडा जाणवेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
 
पुढील दोन महिने राज्यातील तापमान उच्चांकी अंशावर पोहचेल आणि राज्यात यावर्षी प्रचंड उकाडा जाणवेल हा हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरताना दिसत आहे. याशिवाय यावर्षी राज्यात उष्णतेच्या लाटा येतील असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हा अंदाज नागरिकांची झोप उडवणारा ठरत आहे कारण मार्च महिन्यातच सूर्यनारायणाने आपला प्रकोप दाखवायला सुरुवात केली असल्याने पुढील दोन महिने कसे निघेल याच चिंतेत नागरिक आहेत. पुढील दोन महिन्यात राज्यात उष्णतेच्या लाटा येणार असून तापमान प्रचंड वाढणार असल्याने हे दोन महिने जनतेसाठी जीकरीचे ठरणार असल्याने उन्हापासून बचाव करण्याची कसरत नागरिकांना करावी लागणार आहे.
 
उन्हाळा सुरू झाला की नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवू लागतात. उन्हाळ्याच्या झळा वाढल्या की थकवा येणे, चक्कर येणे, हातापायाला गोळे येणे, उष्माघात आणि मृत्यू असे परिणाम माणसांमध्ये दिसून येतात. काहींना डोळ्याचे तर काहींना त्वचेचे विकार जडतात. उन्हाळ्यात विविध प्रकारचे श्वसन विषयक, मेंदूचे आणि हृदयाचे आजार होतात. रक्तदाब आणि मधुमेहासारख्या व्याधी असलेल्या व्यक्तींनी उन्हाळ्यात विशेष खबरदारी घ्यावी. उन्हाळ्यात उष्माघात होण्याचे प्रमाण खूप वाढते. उष्माघातामुळे शरीराचे तापमान उच्च पातळीवर पोहचते. योग्य आणि वेळीच उपचार न मिळाल्यास संबंधित व्यक्ती दगावण्याची शक्यता असते. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. दुपारी बारा ते चार घराबाहेर पडूच नये, काही महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे. घराबाहेर पडताना टोपी, गॉगल, बूट, चपलांचा वापर करावा. हलकी, पातळ, सच्छिद्र कपडे वापरावेत. उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी टोपी, छत्री, गॉगल यांचा नियमित वापर करावा. तापमान वाढले की शरीरातील पाणी कमी होते त्यामुळे डीहायड्रेशन होते.
 
डीहायड्रेशन झाले की शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते आणि चक्कर येते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये यासाठी सतत पाणी पीत राहावे. शरीरात दररोज किमान दोन लिटर पाणी जाणे गरजेचे असते. घराबाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत न्यायला विसरू नका. साध्या पाण्यासोबत नारळपाणी, भाज्यांचे, फळांचे रस दररोज प्यायले तरी हरकत नाही. मार्च महिन्यातच उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्याने पुढील दोन महिने उष्णतेची तीव्रता किती असेल याची कल्पना केली तरी या वर्षीची उन्हाची दाहकता लक्षात येईल. त्यामुळेच प्रत्येकाने उन्हाळ्यात आपले आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. खबरदारी घेऊनच आपण उन्हाच्या तीव्रतेपासून स्वतःचा बचाव करू शकतो.
 
 
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.