विजापूरातील चकमकीत सुरक्षा दलाकडून ६ नक्षलवाद्यांचा खातमा

    27-Mar-2024
Total Views |

security personnel killed 6 Naxalites in an encounter in Bijapur
(image source: internet/representative)
 
एबी न्यूज नेटवर्क:
छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त विजापूरमध्ये सुरक्षा डाळ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याची बातमी समोर आली आहे. बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने एका महिला नक्षलवाद्यासह सहा नक्षलवाद्यांचा खातमा केला आहे. बासागुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. चिकुरबत्ती-पुसबांका जवळील जंगल परिसरात ही चकमक झाल्याचे समजते.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे झालेल्या या चकमकीत डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (DRG), CoBRA (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ॲक्शन) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) च्या २९९ जवानांचा सहभाग होता. चकमकीनंतर राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत ६ नक्षलवाद्यांच्या मृतदेहाबरोबर शस्त्रेही आढळले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात शोध मोहीम सुरू आहे.
 
बासागुडा येथे नक्षलवाद्यांनी होळीच्या दिवशी ३ गावकऱ्यांची धारदार चाकूने गळा कापून हत्या केली होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वी रविवारी डीआरजी जवान दीपक दुर्गम यांच्यावरही नक्षलवाद्यांनी गोळी झाडली होती.