इंक्रेडिबल प्रीमियम लीग

    26-Mar-2024
Total Views |
 
IPL special blog
 (image source: internet/representative)
 
 
जगातील सर्वाधिक महागडी आणि लोकप्रिय लीग म्हणून ओळखली जाणारी इंडीयन प्रीमियम लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामाची सुरुवात २२ मार्च पासून झाली असून पुढील दोन महिने आयपीएलचा थरार चालू राहणार असल्याने क्रिकेट प्रेमींसाठी ती मोठी मेजवानी ठरणार आहे. आयपीएलची सुरुवात २००८ साली झाली. म्हणजे आज आयपीएलला सोळा वर्ष पूर्ण झाली. या सोळा वर्षात क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाच्या बाहेर अनेक घडामोडी घडल्या पण आयपीएलची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. आयपीएल लाही मॅच फिक्सिंग सारखी किड लागली होती. मॅच फिक्सिंगचा आरोप झाल्याने काही खेळाडूंना कायमचे घरी बसवण्यात आले तर चेन्नई आणि राजस्थान या सारख्या लोकप्रिय संघावर दोन वर्षाची बंदी घालण्यात आली होती. मॅच फिक्सिंगमुळे आयपीएलला उतरती कळा लागेल असा अंदाज बांधला जात होता. मात्र तो फोल ठरला उलट आयपीएल आणखी लोकप्रिय ठरली.
 
कोरोनाचा फटका जसा इतर क्रीडा प्रकारांना बसला तसाच तो आयपीएललाही बसला. कोरोनाच्या सावटातही बीसीसीआयने आयपीएलचे यशस्वी आयोजन केले. कधी देशात तर कधी परदेशात, कधी प्रेक्षकांशिवाय तर प्रेक्षकांसह आयपीएलचे आयोजन करून बीसीसीआयने क्रिकेट प्रेमींना आयपीएलचा थरार अनुभवण्याची संधी दिली. जगभरातील इतर लीग कोरोनामुळे ठप्प झाल्या असताना बीसीसीआयने आयपीएलचे यशस्वी आयोजन करून जगापुढे व्यवस्थापनाचा आदर्श घालून दिला. सुरवातीला आठ संघात खेळली जाणारी ही स्पर्धा दोन वर्षापासून दहा संघात खेळली जात आहे. गुजरात टायटन आणि लखनऊ सुपर जायंटस या दोन नव्या संघाची आयपीएलमध्ये एंट्री झाल्याने आयपीएलचा थरार आणखी वाढला आहे. विशेष म्हणजे यातील गुजरात टायटन या संघाने पदार्पणातच विजेतेपद मिळवत अनेकांना अचंबित केले इतकेच नव्हे मागील वर्षीही हा संघ अंतिम फेरीत पोहचला म्हणजे पदार्पणाच्या पहिल्या दोन वर्षातचच विजेतेपद आणि उपविजेतेपद मिळवत या संघाने आपले कर्तुत्व दाखवून दिले आहे.
 
आयपीएलमध्ये दहा संघ असेल तरी आयपीएलवर चेन्नई आणि मुंबई या दोन संघाचेच वर्चस्व राहिले आहे. दोन्ही संघाने प्रत्येकी पाच विजेतेपद पटकावित आयपीएलवर आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. या दोघांशिवाय कोलकोता आणि हैद्राबाद या संघाने प्रत्येकी दोनदा विजेतेपद मिळवले आहे तर राजस्थान आणि गुजरात या संघाने एकदा विजेतेपदावर नाव कोरले आहे. बंगळुरू, पंजाब, दिल्ली यांसारख्या प्रबळ संघांना मात्र अद्याप एकदाही विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. यावर्षी आयपीएलला नवा विजेता मिळेल का? याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागूली आहे. अर्थात यावर्षीही चेन्नई आणि मुंबई हेच दोन संघ विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. याशिवाय कोलकाता, बंगळुरू आणि गुजरात हे देखील विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत. कदाचित यावेळी एखाद्या नव्याच संघाने विजेतेपद पटकावून सर्वांना अचाबित केल्यास आश्चर्य वाटायला नको. या वेळेची स्पर्धा एका नव्या कारणाने देखील चर्चेत आहे ती म्हणजे या वेळी अनेक संघांनी आपले कर्णधार बदलले आहे. ज्या धोनी आणि रोहित शर्माने आपल्या संघाला पाच विजेतेपद मिळवून दिले त्यांना यावेळी फक्त खेळाडू म्हणून मैदानात उतरावे लागेल कारण मुंबईच्या संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माच्या जागेवर हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून निवड केली आहे तर धोनीने स्वतः कर्णधार पदाचा त्याग केल्याने युवा ऋतुराज गायकवाडच्या गळ्यात चेन्नईच्या कर्णधारपदाची माळ पडली आहे.
 
गुजरात संघाच्या कर्णधार पदाची धुरा युवा शुभमन गीलच्या खांद्यावर आहे. कोलकोताचा कर्णधार युवा श्रेयस अय्यर आहे तर जीवघेण्या अपघातातून बाचवलेला ऋषभ पंत दिल्लीचा कर्णधार आहे. या युवा खेळाडूंवर कर्णधार पदाची धुरा देऊन संघ मालकांनी त्यांच्यातील नेतृत्व गुणाला चालना दिली आहे. याच युवा खेळाडूंपैकी एखादा खेळाडू भविष्यात भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो म्हणजे भविष्यातील भारतीय संघाच्या कर्णधाराची पायाभरणी याच आयपीएल मधून होणार आहे. केवळ कर्णधारच नव्हे भविष्यातील संपूर्ण भारतीय संघच आयपीएल मधून निवडला जाईल. आज जे खेळाडू भारतीय संघात दिसतात ते सर्व खेळाडू आयपीएल मधूनच पुढे आले आहेत. भारतीय संघातील आश्विन, जडेजा, शूभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमाराह, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहंमद सिराज, संजू सॅमसन, ईशान किशन असे सर्वच खेळाडू आयपीएलची देण आहे.
 
आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानेच या खेळाडूंना भारतीय संघात प्रवेश मिळाला. आयपीएल म्हणजे भारतीय संघात प्रवेश करण्याचे प्रवेश द्वार आहे त्यामुळेच आयपीएल मध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी खेळाडू मैदानावर घाम गाळतात. आयपीएल मध्ये चांगली कामगिरी करून भारतीय संघात प्रवेश मिळवण्याचे स्वप्न सारे खेळाडू पाहतात ते स्वप्न यशस्वी करण्यासाठी ते जीवाचे रान करतात त्यामुळेच आयपीयलचे सर्व सामने रंगतदार होतात आणि प्रेक्षकांना खेळाचा मनमुराद आनंद लुटता येतो. यावर्षीही आयपीएलचे सर्व सामने रंगतदार होतील आणि प्रेक्षकांना खेळाचा मनमुराद आनंद लुटता येईल यात शंका नाही.
 
 
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.