काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

    26-Mar-2024
Total Views |

- शिंदेंच्या तिकिटावर रामटेकतून लोकसभा लढणार

Congress MLA Raju Parve joins Shiv Sena


नागपूर :
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश (Congress MLA Raju Parve joins Shiv Sena) केला. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जैस्वाल उपस्थित होते. पारवे हे रामटेकमधून महायुतीचे लोकसभेचे उमेदवार असतील. काँग्रेसने रामटेकमधून सुनील केदार यांच्या निकटवर्तीय रश्मी बर्वे यांना शनिवारीच उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पारवे यांनी पक्षाला रामराम ठोकत महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. रामटेक लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती (एससी) साठी राखीव आहे.
 
उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी रविवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्षांकडे आपला आमदारकीचा राजीनामा दिला होता. सोबतच, पारवे यांनी काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पारवे हे शिवसेनेच्या तिकिटावर रामटेक लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.
 
नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे काँग्रेस आमदार पारवे भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे आधीपासून सांगितल्या जात होते. गेल्या आठवड्यात पारवे यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यामुळे ते लवकरच काँग्रेसला रामराम ठोकतील असे बोलले जात होते.