Blog : अपप्रवृत्तीमुळे पवित्र सणाला गालबोट लागते

24 Mar 2024 12:08:24

Holi the sacred festival is marred by immorality
 (Image Source : Internet/ Representative)
 
 
होळी हा आपल्या संस्कृतीतील एक मोठा आणि महत्वाचा सण आहे. भारतातील वेगवेगळ्या भागात फाल्गुन पौर्णिमेला हा सण विविध नावांनी साजरा केला जातो. हा सण होळी, होलिकादहन, शिमगा अशा विविध नावांनी साजरा केला जातो. होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाने आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाने आगीत जाळून सत्प्रवृत्ती आणि सद्गुणांचा संकल्प करण्याचा हा दिवस.
 
होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुळवड असेही म्हणतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी अग्नीत गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील एक कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याची प्रथा आहे. या दिवशी एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकता जपणे हा याचा उद्देश. बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून या सणाकडे पाहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव भांडण विसरून एकत्र येतात. मात्र गेल्या काही वर्षात या सणामध्ये शिरलेल्या अपप्रवृत्तीमुळे या सणाचे पावित्र्य लोप पावले आहे.
 
होळीचा सण साजरा करताना धांगडधिंगा घातला जातो. धुलीवंदनाच्या दिवशी तर एकमेकांना गुलाल लावण्याऐवजी रसायन मिश्रित रंग लावले जातात. पाण्याचा अपव्यय केला जातो. काही समाज कंटक पाण्याने, रंगाने भरलेले फुगे, पिशव्या रेल्वे गाड्या, बसगाड्यावर तसेच रस्त्यावर फेकून मारतात. त्यात अनेकजण जखमी होतात. अशा घटनांत यापूर्वी काहींना आपले डोळे गमवावे लागले आहेत, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. काही महाभाग तर जाणीवपूर्वक महिलांना टार्गेट करतात. काहीजण रंगाऐवजी नासकी अंडी फेकून मारतात. काहीजण तर या दिवशी लाऊडस्पिकरवर मोठ्या आवाजात गाणी लावून हिडीस नृत्य करतात.
 
धुलीवंदनच्या दिवशी मद्यपान करण्याची नवीनच फॅशन निर्माण झाली आहे. मद्यपान करून नृत्य करताना बऱ्याचदा वाद होतो. हा वाद विकोपाला गेला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. वास्तविक होळी आणि धुलीवंदन हे अतिशय पवित्र सण आहेत. मात्र या अपप्रवृत्तीमुळे या सणाला गालबोट लागत आहे. ही अपप्रवृत्ती दूर करून सर्वांनी होळीचा सण साजरा करावा. जे समाज कंटक या पवित्र सणाला गालबोट लावतील त्यांना पोलिसांनी कडक शासन करावे.
 
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.
Powered By Sangraha 9.0