Moscow Concert Hall Attack: अंदाधुंद दहशतवादी हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू, 'या' संघटनेने घेतली जबाबदारी

    23-Mar-2024
Total Views |

Moscow Concert Hall Attack
 (Image Source : Twitter/ Screengrab)
 
मॉस्को :  
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये शुक्रवारी झालेल्या अंदाधुंद दहशतवादी हल्ल्याने (Moscow Concert Hall Attack) देशभरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यात 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 145 हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा हल्ला रशियातील दोन दशकांतील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी 1999 मध्ये दक्षिण पूर्व मॉस्कोमध्ये आठ माजली इमारतीत बॉम्ब स्फोट करण्यात आला होता. या हल्ल्यात जवळपास 118 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
 
रशियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉस्कोजवळील क्रोकस सिटी हॉलमध्ये कॉन्सर्ट सुरू असताना कॅमफ्लाज घातलेल्या बंदूकधाऱ्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी स्वयंचलित शस्त्रांनी अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांनी हॉलमध्ये स्फोटकांचा स्फोटही केला, त्यामुळे तेथे आग लागली. हल्ल्यानंतर विशेष पोलीस दलाने पदभार स्वीकारला आहे.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, क्रोकस सिटी हॉलमध्ये कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. कॉन्सर्टसाठी येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान, कॅमफ्लाज घालून आलेल्या तीन ते चार बंदुकधारींनी एकाच वेळी लोकांवर गोळीबार सुरू केला, इतकेच नाही तर हल्लेखोरांनी स्फोटकांचाही वापर केला, ज्यामुळे हॉलमध्ये स्फोट झाला आणि मोठी आग लागली. या भ्याड हल्ल्यात किमान 60 लोकांचा मृत्यू झाला असून 145 हून अधिक जण जखमी झाले असल्यादावा मीडिया रिपोर्ट्स करत आहेत. पोलिसांचे पथक लोकांना बाहेर काढण्यात आणि जखमींना रुग्णालयात नेण्यात व्यस्त आहे. रिपोर्टनुसार, दहशतवाद्यांनी शेकडो लोकांना बंधकही बनवले आहे. मात्र, ओलीसांची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
 
 
 
आपत्कालीन सेवा मंत्रालयाने सांगितले की, गोळीबारानंतर सुमारे 100 लोक हॉलच्या तळघरातून पळून जाण्यात यशस्वी झाले, तर इतर छतावर लपले. निवेदनात म्हटले आहे की रॉक बँडच्या सर्व सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. त्याचबरोबर दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
'या' संघटनेने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी
इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया ॲण्ड इराक (ISISI) या दहशतवादी संघटनेने मॉस्कोमधील कॉन्सर्ट हॉलवर झालेल्या मोठ्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. इस्लामिक स्टेटने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या निवेदनात या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. ISIS ने त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, 'आमच्या सैनिकांनी रशियाची राजधानी मॉस्कोच्या बाहेरील क्रोकस कॉन्सर्ट हॉलवर हल्ला केला. हल्लेखोर सुरक्षितपणे त्यांच्या तळावर परतले आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, रशियन मीडियाने संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.