लोकसभा निवडणूक : आमदार बळवंत वानखडे यांना काँग्रेसकडून मिळाली उमेदवारी

    21-Mar-2024
Total Views |
 
MLA Balwant Wankhade got nomination from Congress
 
 
अमरावती:
लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. राज्यात महाविकास आघाडीतील एकाही पक्षाने अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. मात्र आज काँग्रेसच्या निवडणूक समितीची नवी दिल्ली येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील काही उमेदवार निश्चित करण्यात आली, ज्यामध्ये अमरावतीमधून दर्यापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी घोषीत करण्यात आली. वानखडे यांच्या नावाची घोषणा होताच येथील काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
 
राज्यात काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे आघाडीच्या जागावाटपात ज्या जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे, त्या जागांवरील उमेदवारांबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. नवी दिल्ली येथे काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणूगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी, सलमान खुर्शीद, मधुसूदन मिस्त्री पी.एल. पुनिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात उपस्थित होते. बैठकीत काही नावांबाबत एकमत झाल्याची माहिती आहे.
 
काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी
 
नागपूर - विकास ठाकरे
नांदेड - वसंत चव्हाण
लातूर - शिवाजी काळगे
नंदुरबार - के.सी.पाडवी
गडचिरोली - नामदेव उसेंडी
कोल्हापूर - शाहू महाराज छत्रपती
सोलापूर - प्रणिती शिंदे
पुणे - रविंद्र धंगेकर
अमरावती - बळवंत वानखडे