लोकसभा निवडणुकांपूर्वी छत्तीसगड काँग्रेसच्या अडचणींत वाढ; माजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल

    20-Mar-2024
Total Views |
 
FIR registered against the former CM Bhupesh Baghel Ahead of Lok Sabha Elections
 (image source: internet/representative)
 
रायपूर :
देशभरात १८ व्या लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरु आहे. सत्ताधारी आणि विपक्ष आपल्या प्रचारासाठी विविध प्रयत्न करत आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकांपूर्वी छत्तीसगड काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. रायपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेने राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याविरुद्ध फसवणूक, गुन्हेगारी कट, विश्वासभंग, बनावट कागदपत्रे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही कारवाई काँग्रेस नेत्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण करणारी आहे. इतकेच नाही कोळसा घोटाळा, दारू घोटाळा, तांदूळ घोटाळा, जिल्हा खनिज निधी घोटाळा अशा अनेक घोटाळ्यामध्ये काँग्रेसजणांची नावे समोर आली आहेत.
 
दरम्यान, काँग्रेसने माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना राजनांदगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. महादेव ॲप प्रकरणात भूपेश बघेल अडकले असताना, कोळसा घोटाळा प्रकरणात काँग्रेस आमदार देवेंद्र यादव यांच्यासह अनेक नेत्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. देवेंद्र यांना बिलासपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची तयारी करण्यात आली होती.
 
याशिवाय, माजी मंत्री अमरजीत भगत, माजी मंत्री कवासी लखमा आणि इतर आमदारांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची छत्तीसगडमधील अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण ब्युरो (EOW) मध्ये चौकशी केली जात आहे. दोन हजार कोटींहून अधिक किंमतीच्या दारू घोटाळ्यात ईडीच्या तपासानंतर ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.