पप्पू देशमुख यांचे पोलिस ठाण्यात अन्न व जलत्याग आंदोलन

    12-Mar-2024
Total Views |

pappu deshmukh's food and water sacrifice movement at the police station
 
चंद्रपूर :
शंभर कोटी रुपयांच्या जुन्या भूमिगत गटार योजनेतील भ्रष्टाचार व 506 कोटी रुपयांच्या नवीन भूमिगत गटार योजनेच्या निविदा प्रक्रियेतील गैरवहारा विरोधात आवाज उचलल्यामुळे पोलिसांनी मला ताब्यात घेतले. शासनाच्या व पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करतो.अशा दडपशाहीला आपण भिक घालत नाही. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या शासनाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. पोलिसांच्या ताब्यात असेपर्यंत मी अन्न व जलत्याग करित आहे. मागील पंधरा वर्षांपासून खड्डे व धुळीमुळे मानेच्या, मणक्याच्या, कमरेच्या दुखण्याने व श्वसानाच्या- हृदयाच्या आजाराने त्रस्त झालेल्या चंद्रपूरकरांना वाऱ्यावर सोडणार नाही.
 
चंद्रपूरकरांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी प्रतिक्रिया जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे रामनगर पोलिसांनी देशमुख यांना 12 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता वरोरा नाका चौकात अटक करून ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देशमुख यांनी अन्न व जलत्याग आंदोलन सुरू केले.
 
15 वर्षांपूर्वी तत्कालीन नगरपालिकेने संपूर्ण चंद्रपूर शहरातील रस्ते खोदून टाकलेल्या भूमिगत गटार योजनेचे काय झाले ? ही योजना कार्यान्वयीत का झाली नाही ? योजना कार्यान्वयीत झालेली नसताना कंत्राटदाराची देयके कशी देण्यात आली? दोषी कंत्राटदार व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नाही ? 506 कोटींच्या नवीन भूमिगत गटार योजनेच्या निविदा प्रक्रियेत नियमांना बगल का देण्यात आली ? कंत्राटदाराने बँक गॅरंटी जमा केलेली नसताना व कंत्राटदाराला कार्यादेश दिलेला नसताना भूमिपूजनाची घाई का करण्यात आली ? अंदाजपत्रकापेक्षा 60 कोटी रुपये जास्त किमतीत कंत्राट का देण्यात आले ?
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांना या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. अन्यथा चंद्रपूरची जनता त्यांना माफ करणार नाही असा इशारा देशमुख यांनी दिला.