रविचंद्रन आश्विनचे विक्रमी ५०० बळी

    01-Mar-2024
Total Views |

off spinner ravichandran ashwin records 500 wickets(Image Source : Internet/ Representative) 
भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने इंग्लंड विरुद्धच्या राजकोट कसोटीत ५०० बळींचा टप्पा गाठत विक्रमी कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये पाचशे बळी घेणारे मोजकेच गोलंदाज आहेत त्यात आता आश्विनचा समावेश झाला आहे. भारताच्या दृष्टीने पाहायला गेले तरी कसोटीत पाचशे बळी मिळवणारा तो भारताचा दुसराच गोलंदाज आहे. या आधी अशी कामगिरी भारताचा महान लेगस्पिनर अनिल कुंबळे यालाच करता आली आहे. म्हणजे त्याच्यापुढे आता फक्त अनिल कुंबळे आहे. अनिल कुंबळे याने ६०० च्या वर बळी घेतले आहेत. याचाच अर्थ दोघांमध्ये आता फक्त १०० बळींचे अंतर आहे.
आश्विन आता ३७ वर्षाचा आहे. त्याचा फॉर्म आणि फिटनेस उत्तम आहे, त्यामुळे तो आणखी दोन अडीच वर्ष सहज खेळू शकतो. तो जर आणखी दोन अडीच वर्ष खेळला तर अनिल कुंबलेला मागे टाकून भारताकडून सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज ठरू शकतो. आज आश्विन हा जगातील सर्वाधिक धोकेदायक गोलंदाज समजला जातो. विशेषतः भारतीय खेळपट्ट्यांवर तर तो अधिक धोकेदायक ठरतो. त्याने मिळवलेल्या ५०० बळीपैकी ३५० हून अधिक बळी त्याने भारतात घेतल्या आहेत. परदेशातही त्याची कामगिरी चांगली आहे. परदेशातही त्याने बळी मिळवलेले आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यासारख्या प्रबळ संघाविरुद्ध त्याने सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने केवळ गोलंदाज म्हणून नाही तर फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी केली आहे. कसोटीत त्याने पाच शतके झळकावली आहेत. कसोटीत पाच शतके झळकवणे ते ही सातव्या, आठव्या क्रमांकावर येऊन ही साधी गोष्ट नाही. कसोटीत ५०० बळी आणि ५ शतक झळकावणारा तो एकमेव खेळाडू आहे. अशी कामगिरी एक चांगला अष्टपैलू खेळाडूच करू शकतो. आश्विनने हे करून आपण केवळ गोलंदाज नसून अष्टपैलू खेळाडू आहोत हे सिद्ध केले आहे.
आश्विनने केवळ कसोटीतच नाही तर एकदिवसीय आणि टी २० सामन्यात ही चमकदार कामगिरी केली आहे. एकदिवसीय आणि टी २० सामन्यातही त्याने खूप बळी मिळवले आहे. कसोटी प्रमाणेच एकदिवसीय आणि टी २० सामन्यातही त्याने भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत. आश्विन हा भारताचा खराखुरा मॅच विनर खेळाडू आहे. २०११ साली जेंव्हा त्याने भारताकडून कसोटीत पदार्पण केले तेंव्हा अनिल कुंबळे निवृत्त झाला होता तर हरभजन सिंगचा उतरता काळ सुरू झाला होता. या दोघांनी जवळपास दीड दशके भारतीय फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळली होती त्यांच्या नंतर भारतीय फिरकीची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न होता कारण त्यावेळी त्यांची जागा घेणारा तर सोडाच पण त्यांच्या जवळपास जाऊ शकणारा एकही फिरकी गोलंदाज दिसत नाही. आश्विन ज्यावेळी आला त्यावेळीही तो इतकी मोठी मजल मारेल असे भाकीत कोणी केले नव्हते. मात्र त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले त्यामुळेच तो आज महान गोलंदाजांच्या पंगतीत बसला आहे.
रविचंद्रन आश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी देशांतर्गत क्रिकेट ही गाजवून सोडले होते. त्याने रणजी सामन्यात सातत्याने बळी मिळवले मात्र त्याला खरी ओळख मिळवून दिले ती आयपीएलने. आयपीएलमध्ये आश्विनने चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे प्रतिनिधित्व केले. मुथय्या मुरलीधरन हा चेन्नई सुपरकिंग्जचा प्रमुख फिरकी गोलंदाज होता. कर्णधार महेंद्रसिंग धोनीला गोलंदाजीची सुरुवात फिरकीने करायची होती मात्र मुरलीधरन सुरुवातीलाच गोलंदाजी करण्यास तयार नसल्याने धोनीने चेंडू आश्विनकडे सोपवला. आश्विनने या संधीचे सोने करीत प्रतिस्पर्धी संघाची सलामीची फळी कापून काढण्याची कामगिरी केली तिथेच धोनीचा आश्विनवर विश्वास बसला. आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्याने धोनीने त्याला भारताकडून खेळायची संधी दिली.
आश्विनने धोनीने टाकलेला विश्वास सार्थ ठरवला. मागील १३ वर्षात त्याने भारताला अनेक अविश्वसनीय विजय मिळवून दिले आहेत आता त्याने भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद मिळवून द्यावे हीच त्याच्याकडून क्रिकेट प्रेमींनी अपेक्षा आहे. ५०० बळींचा टप्पा पार करणाऱ्या रविंचंद्रन आश्विनचे मनापासून अभिनंदन!!!
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.