खेलो इंडिया विद्यापीठ गेम्स; नेहा ढबालेला रौप्यपदक

    26-Feb-2024
Total Views |

Neha Dhakala won silver medal
 
 
नागपूर :
गुवाहाटी आसाम येथे सुरु असलेल्या ४ थ्या खेलो इंडिया विद्यापीठ गेम्समध्ये अ‍ॅथलेटिक्स क्रीडा प्रकारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेहा ढबाले आणि आदर्श भुरे याने पदक प्राप्त करण्याची कामगिरी केली आहे.
 
आयजी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियम सरुसाजल येथे झालेल्या महिलांच्या ४०० मीटर हर्डल्स स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची नेहा ढबालेने १ मि. ०.३३ अशी वेळ देत रौप्यपदक प्राप्त केले. जानेवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांमध्ये ४०० मीटर धावण्यात नेहा ढबालेने ५७.०६ अशी वेळ नोंदवित सुवर्णपदक प्राप्त केले होते. शिवाय महिला गटात नेहा ढबालेने सर्वाेत्कृष्ट अ‍ॅथलिट्स होण्याचा मान देखील मिळविला होता. या स्पर्धेत काही वेळेच्या फरकाने नेहाचे सुवर्णपदक हुकले. सुवर्णपदक कन्नुर विद्यापीठाच्या डेलना फिलीपने तर कांस्यपदक शिवाजी विद्यापीठाच्या अनुष्का दत्तात्रयने प्राप्त केले.
 
पुरुष गटात १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आदर्श भुरेने कांस्यपदक प्राप्त केले. आदर्शने १२.३९ अशी वेळ दिली. सुवर्णपदक १०.५४ अशी वेळ नोंदवित चंदीगढ विद्यापीठाच्या गुरविंदर सिंगने तर रौप्यपदक कॅलिकट विद्यापीठाच्या अजिथ जॉनने ११.२२ अशी वेळ देत प्राप्त केले. राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत आदर्श भुरेने १०० व २०० मीटर धावण्याच्या शर्यंतीत सुवर्णपदक प्राप्त केले होते. १०० मीटरमध्ये आदर्शने १०.८३ अशी वेळ नोंदविली होती. मात्र, खेलो इंडियात आदर्शला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. नेहा ढबाले ही प्राचार्य अरुणराव कलोडे महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून आदर्श भुरे हा आर. जी. भोयर काॅलेज सेलू चा विद्यार्थी आहे. डॉ. व्ही. एन. सिंग यांच्या अध्यक्षतेत गठीत झालेल्या डॉ. आदित्य सोनी, डॉ. अविनाश सहारे, डॉ. अरुणा थुल यांनी ॲथलेटिक्स संघाची निवड केली. नेहा ही डाॅ. ब्रिजमोहन रावत यांच्या तर आदर्श माजी आंतरराष्ट्रीय पदक विजेते रितेश आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.
 
खेळाडूंनी मिळविलेल्या पदकाबद्दल नागपूर विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद सुर्यवंशी यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.