Blog : रेडिओचा आवाज हरपला

    25-Feb-2024
Total Views |
 
The voice of radio lost
 (Image Source : Internet)
 
 
'बहनो और भाईयो, अगले पायदान पर है ये गाना...' असे म्हणत अनेक वर्ष रेडिओ वर बिना का गीतमाला हा कार्यक्रम सादर करून आपल्या शैलीदार आणि रसाळ निवेदनाने संगीत प्रेमिंच्या गळ्यातील ताईत बनलेले जेष्ठ निवेदक अमीन सयानी यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने रेडिओचा आवाज हरपला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण अमीन सयानी यांनी जवळपास पाच दशकांहून अधिक काळ रेडीओवर निवेदन करून संगीत प्रेमींना मंत्रमुग्ध केले.
 
एकेकाळी अमीन सयानी यांनी 'आवाज की दुनिया के दोस्तों...' अशी स्नेहपूर्ण साद घालून रसिकांच्या मनावर आणि हृदयावर बिना का गीतमाला या प्रचंड लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वर्ष राज्य गाजवले. अमीन सयानी यांनी रेडिओ सिलोन आणि त्यानंतर विविध भारतीच्या माध्यमातून आपल्या जादुई आवाजाने श्रोत्यांच्या मनावर पाच दशकं अधिराज्य गाजवले. त्यांचा बिना का गीतमाला हा कार्यक्रम घराघरात ऐकला जायचा. श्रोते बिना का गीतमाला या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहायचे. अमीन सयानी यांच्या आवाजाने संगीत रसिकांच्या चार पिढ्यांवर गारूड केले. रेडिओ निवेदनाला खऱ्या अर्थाने वलय प्राप्त करून देणाऱ्या अमीन सयानी यांनी आपल्या निवेदनाने देश विदेशातील स्टेज शो देखील गाजवले.
 
अमीन सयानी यांनी केवळ निवेदन केले नाही तर अनेक गायक, गीतकार, संगीतकार यांना मुलाखतीच्या निमित्ताने बोलते करून त्यांच्या गाण्याचा सृजनशील प्रवास ध्वनिमुद्रित केला. माझा आवाज फुटला नाही म्हणून मी गाऊ शकलो नाही ती सगळी कसर मी भरपूर गाणी ऐकून भरून काढली असे त्यांनी एका मुलखतीत सांगितले होते. अमीन सयानी यांचा जन्म गुजराथी मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे वडील व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांचे शिक्षण मुंबई व ग्वाल्हेर येथे झाले. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. रवींद्र संगीतातील गाणी देखील ते म्हणायचे.
 
हिंदी, उर्दू, पंजाबी, बंगाली, संस्कृत या भाषा त्यांना अवगत होत्या. एक दिवस ओवल टाईन फुलवारी या कार्यक्रमाच्या निवेदकाची तब्येत अचानक बिघडल्याने कार्यक्रमासाठी निवेदन करावे अशी गळ आयोजकांनी अमीन सयानी यांना केली. त्यांनी त्या कार्यक्रमाचे यशस्वी निवेदन केले. पुढे त्यांना अनेक कार्यक्रमासाठी निवेदन करण्याच्या ऑफर येऊ लागल्या. खर्जातिल आवाज, शुद्ध उच्चार, हिंदी भाषेवरील पकड यामुळे त्यांचे निवेदन लोकप्रिय होऊ लागले. त्याच दरम्यान रेडिओ सिलोनने हिंदी गाण्यांच्या कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले. या कार्यक्रमाला बिना का गीतमाला असे नाव देण्यात आले. या कार्यक्रमात निवेदन करण्यासाठी अमीन सयानी यांची निवड झाली.
 
आठवड्याला २५ रुपये इतके मानधन रेडिओ सिलोन ने त्यांना देऊ केले. १९५२ साली सुरू झालेला हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला. बिना का गीतमाला लोकप्रिय होण्यामागे सर्वाधिक वाटा होता तो अमीन सयानी यांचा. तीन दशकांहून अधिक काळ हा कार्यक्रम रेडीओवर सुरू होता. हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात बिना का गीतमाला कार्यक्रम माईल स्टोन ठरला. बिना का गीतमाला सोबतच त्यांनी रेडिओवर अन्य कार्यक्रम देखील केले. संपूर्ण आयुष्यात त्यांनी ५४००० पेक्षा अधिक रेडिओ कार्यक्रमाचे निवेदन केले. आवाजाचा अनभिषिक्त सम्राट अशीच त्यांची ओळख निर्माण झाली. आवाजाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखल्या गेलेल्या अमीन सयानी यांच्यासारखा निवेदक पुन्हा झाला नाही, होणार नाही. या सम हा अशी प्रतिभा असलेला हा निवेदक आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. रेडिओचा आवाज बनून संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अमीन सयानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.