फॅसिझमचे पुरस्कर्ते वाल्दमिर पुतीन

    22-Feb-2024
Total Views |

A supporter of fascism Vladimir Putin
 (Image Source : Internet)
 
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतीन हे जगात आक्रमक राष्ट्राध्यक्ष म्हणून ओळखले जातात. रशियावर त्यांची एक हाती हुकूमत आहे. एक प्रकारे ते रशियाचे हुकूमशहाच आहे. रशियात त्यांच्याविरुद्ध कोणी ब्र शब्दही काढत नाही. सत्तेवर येताच त्यांनी घटना दुरुस्ती करून स्वतः कडे अमर्याद अधिकार घेतले. इतकेच नाही तर त्यांनी निवडणुका न घेताच पुढील काही वर्षासाठी स्वतःला रशियाचा अनाभिक्षित सम्राट म्हणून घोषित केले.
 
लोकशाहीचा आणि त्यांचा दुरान्वये संबंध नाही. फॅसिझमचे कट्टर पुरस्कर्ते असलेले पुतीन यांना कोणी विरोध केलेला चालत नाही. त्यांच्या देशात त्यांना विरोध करणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे तसे धाडस कोणी करत नाही. मात्र काही लोक असतात जे मृत्यूलाही न घाबरता जनतेसमोर सत्य मांडण्याचा प्रयत्न करतात. असेच धाडस त्यांचे राजकीय विरोधक अलेक्सा नवालनी यांनी केले.
 
नवालनी यांनी पुतीन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. पुतीन यांनी त्यांच्या काळात मोठा भ्रष्टाचार केला असून या भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांनी मोठे जनआंदोलन उभारले होते. जनतेचाही या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत होता. या दरम्यान त्यांच्यावर एकदा विष प्रयोग ही करण्यात आला होता. ते जर्मनीत असताना त्यांच्यावर विष प्रयोग करण्यात आला. पुतीन यांनीच त्यांच्यावर विष प्रयोग करून त्यांना जिवेमारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तेव्हा करण्यात आला होता. विष प्रयोग होऊनही नवालनी त्यातून बचावले होते. जर्मनीतून ते पुन्हा मॉस्कोत आले आणि त्यांनी पुतीन यांच्या विरोधातील आंदोलन पुन्हा सुरू केले. नवालनी यांना जनतेचा पाठिंबा मिळत आहे, असे दिसताच पुतीन यांनी त्यांना पॅरोलचे उल्लंघन, फसवणूक आणि न्यायालयाचा अपमान या गुन्ह्याखाली अटक केली. त्यांना तब्बल नऊ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. पुतीन यांच्या या निर्णयाविरोधात रशियात मोठा जनक्षोभ होता, मात्र उघडपणे तसे कोणीही बोलत नसे.
 
दोन महिन्यांपूर्वी नवालनी यांना अचानक रशियाच्या तुरुंगातून अर्टिक सर्कलवर असलेल्या विशेष तुरुंगात हलवण्यात आले. नवालनी यांना ज्यावेळेस अर्टिक सर्कलच्या विशेष तुरुंगात हलवण्यात आले तेव्हाच काही तरी विपरीत घडणार अशी शंका व्यक्त करण्यात आली आणि ती शंका मागील आठवड्यात अखेर खरी ठरली.
 
मागील आठवड्यात नवालनी यांचा तुरुंगात मृत्यू झाल्याची बातमी आली. नवालनी यांचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याचे पुतीन सरकारकडून जाहीर करण्यात आले असले तरी अनेकांनी नवालनी यांचा मृत्यू आजारपणामुळे झाला नसून त्यांची हत्याच झाल्याचा आरोप केला आहे. खुद्द नवालनी यांच्या कुटुंबीयांनी देखील तसाच आरोप केला आहे. अर्थात नवालनी यांची हत्या झाली की त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला हे कायम गुलदस्त्यात राहणार आहे. कारण हुकूमशहांच्या देशातील कोणतीही खरी गोष्ट जगासमोर येत नाही, मग तो देश चीन असो उत्तर कोरिया असो की रशिया. अर्थात या तिन्ही देशांचे प्रमुख फॅसिझमचे प्रतिनिधित्व करतात. म्हणूनच या देशात लोकशाही नसून हुकूमशाही आहे.
 
चीन आणि उत्तर कोरिया या देशांतील प्रमुखांप्रमाणे पुतीन यांनीही रशियावर आपली एक हाती हुकूमत राखली आहे. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले पुतीन हे के जी बी या रशियाच्या गुप्तहेर संस्थेत काम करीत होते. तेथील त्यांच्या कामावर रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्तसिन इतके खुश झाले की त्यांनी पुतीन यांना आपला राजकीय वारस बनवले. रशियात पुतीन यांच्याबाबतीत अनेक भाकडकथा प्रसिद्ध आहेत . के जी बी मध्ये असताना त्यांनी केलेले काम पाहून लोकांनी त्यांना हिरोची उपमा दिली होती मात्र आता ते ज्या पद्धतीने सरकार चालवत आहे त्याविषयी लोकांमध्ये त्यांच्याविरुद्ध प्रचंड नाराजी आहे. त्यांनी युक्रेनवर केलेला हल्ला अनेक रशियन नागरिकांना आवडला नाही. त्यातच नवालनी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने ही नाराजी आणखी वाढली आहे मात्र पुतीन यांना त्याचा काही फरक पडणार नाही कारण ते कधीच लोकशाही मानत नाही. मात्र आज नाही तर भविष्यात जनता रस्त्यांवर नक्की उतरेल आणि जनताच पुतीनशाहीचा अंत करेल.
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.